मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
कोल्हापूर

तुमच्यासारखे लोटांगण घालायला दिल्लीत जात नाही : मुख्यमंत्री शिंदे

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; कोल्हापुरातून प्रचार सुरू : 10 कलमी वचननामा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दिल्लीतील केंद्र सरकारकडे आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी मदतनिधी मागायला जातो. तुमच्यासारखे दिल्लीपुढे लोटांगण घालण्यासाठी जात नाही. आम्ही शिवसेनेत बंडखोरी केली नसती, तर काँग्रेसने शिवसेना विकली असती, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. वारंवार राज्याची देशात आणि परदेशात बदनामी करणारी महाविकास आघाडी महाराष्ट्रद्रोही आहे, असा घणाघात करत जनतेने महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणावे. डबल इंजिन हीच विकासाची डबल गॅरंटी आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. दरम्यान, राज्यातील सरसकट जनतेला वीज बिलात 30 टक्के सवलत, लाडकी बहीणची रक्कम 1,500 वरून 2,100 करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

महायुतीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय निर्धार सभा कोल्हापुरात झाली. त्यात शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी महायुतीचे जिल्ह्यातील उमेदवार हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे, अशोकराव माने हे दहा उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र 1 नंबर

महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक 52 टक्क्यांनी वाढल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात आता सात लाख कोटींची गुंतवणूक आणली आहे. मोठमोठे उद्योगधंदे आल्याने परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र एक नंबरवर आहे. केंद्र सरकार आणि निती आयोगाकडूनही भरघोस मदतनिधी मिळत आहे. कडकसिंग बनून गेल्यावर निधी कसा मिळेल? योग्य योजना घेऊन गेल्यानंतर केंद्र सरकार मदत करते. केंद्रात आणि राज्यात एका विचाराचे सरकार असल्यावर निधी मिळून राज्य प्रगतीकडे जाते.

पंतप्रधान मोदी यांच्यामुळे जगात भारताला मान

काँग्रेसचा एक नेता जगभर भारताची बदनामी करत फिरत आहे. तर दुसरे महाविकास आघाडीतील काँग्रेससह इतर पक्ष महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रद्रोही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही. त्यांच्यामुळेच जगात भारताचे नाव अभिमानाने घेतले जाते. देश आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. 11 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आपली अर्थव्यवस्था आली आहे. आता तिसर्या स्थानावर नेण्याचे उद्धिष्ट आणि 5 ट्रीलीयन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

लाडकी बहिण योजना बंद होणार नाही...

महायुती सरकारने जनतेसाठी अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या योजना सुरू करण्यासाठी धाडस आणि हिमंत लागते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ अडीच कोटी भगिनींना मिळत आहे. त्याबरोबरच लेक लाडकी लखपती, युवकांना शिक्षण घेताना शिष्यवृत्ती दिली. मात्र काँग्रेसने लाडकी बहिण योजना थांबविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फटकारल्यानंतर ते तोंडघशी पडले. त्यानंतर 1500 रुपयात बहिणींना विकत घेत आहेत असा आरोप करत आहेत. त्यांनी जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगावी. कोणताही माय का लाल आला तरीही लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. त्याऊलट रक्कम 2100 रु. करू.

बहिणींनी सरकारला आशिर्वाद द्यावा...

बहिणींनी मतदानातून महायुती सरकारला आशिर्वाद द्यावा. सरकार बहिणींना देताना हात आखडता घेणार नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या आणि पैशाच्या राशीत लोळणार्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही. पण याच दीड हजारातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत. आत्मनिर्भर बनत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्याला विरोध करून गरीबांच्या तोंडचा घास काढून घेण्याचे पाप करत आहे.

महाविकास आघाडी विकासाचे मारेकरी...

राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे यात आम्हाला कसलाही कमीपणा वाटत नसल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, याच डबल इंजिन सरकारला केंद्र सरकार मदत करते. राज्याच्या विकासासाठी आम्ही निधी मागतो, आमच्यासाठी नाही. तुमच्यासारखे दिल्लीत लोटांगण घालायला जात नाही. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या सत्तेत काय केले आणि महायुतीने दोन वर्षात काय केले? याचा हिशोब करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करू. महाविकास आघाडीने राज्यातील सर्व प्रकल्पाला स्पीड ब—ेकर लावून ते बंद पाडले. महाराष्ट्राच्या इतिहासात महाविकास आघाडीची नोंद विकासाचे मारेकरी म्हणून होईल. मात्र महायुती सरकारने स्पीड ब—ेकर हटवून पुन्हा सर्व प्रकल्प सुरू करून राज्य प्रगतीपथाकडे नेले, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शक्तीपीठ लादणार नाही...

कुणावरही शक्तीपीठ लादणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना समृध्दी महामार्ग प्रकल्प केला. त्यामुळे 18 तासाचे अंतर 7 तासात कापले जात आहे. कुत्रेही जात नव्हते, तेथे आता मल्टीनॅशनल कंपन्या आल्या आहेत. कनेक्टिव्हीटी वाढल्याने हा बदल झाला आहे. राज्यात 204 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षात चार कोटी दिले. परंतू मी मुख्यमंत्री झाल्यांतर गेल्या दोन वर्षात 350 कोटी मदतनिधी दिला. त्यातून एक लाख लोकांचा जीव वाचला, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

वाटाघाटी करून निर्णय बदलत होते...

कोरोना कालावधीत लॉकडाऊन हा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवडीचा विषय असल्याचा टोला लगावून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जपान, चीनमध्ये कोरोना वाढला तरीही ते महाराष्ट्रात लॉकडाऊन लावत होते. त्यातूनच खिचडी चोरी, डेडबॉडीत घोटाळा झाला. इकडे माणसं मरत होती आणि तिकडे पैसे मोजले जात होते. तुमच्या कालावधीत हनुमान चालिसा म्हणणार्यांनीही जेलमध्ये टाकले जात होते. उद्योगपतींच्या घराजवळ बॉम्ब ठेवले जात होते. वाटाघाटी करून निर्णय बदलले जात होते, असा आरोपही शिंदे यांनी केला.

23 ला विजयाचा गुलाल उधळायला येऊ...

राज्याच्या इतिहासात नवा अध्याय सुरू असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 सालात शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडला. त्यावेळी राज्यात सत्ता आली. 2014 सालातही कोल्हापुरातून प्रचाराला सुरूवात झाल्याने सत्ता आली. आताही आई अंबाबाई देवीच्या दर्शनाने कोल्हापुरातूनच प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. अंबाबाई आणि करवीर नगरी पाठिशी असल्याने पुन्हा महायुतीची सत्ता येईल. त्यामुळे 23 नोव्हेंबरला विजयाचा गुलाल उधळायला येऊ.

जनता तुमची सूज उतरवेल...

महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळाले असा खोटा आरोप केला जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकसभेत संविधान बदलाचा फेक नरेटीव्ह करण्यात आला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. ते कोणीही बदलणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तर संविधान म्हणजे जीव की प्राण आहे. फेक नरेटीव्ह करून लोकसभेत तुम्हाला मतांची सूज आली होती. आता विधानसभेत जनता तुमची ही सूज उतरविल्याशिवाय राहणार नाही.

धनुष्यबाण जीवापाड जपला...

जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिल्यानंतरही तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी काँग्रेसच्या दावणीला बांधले गेला, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही बंडखोरी केली नसती तर काँग्रेसने शिवसेना विकून टाकली असती. शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण आम्ही जीवापाड जपला. 50 आमदारांनी सत्ता सोडली.

लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायला तयार...

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महायुती सरकारने केलेल्या सर्व योजनांची चौकशी करू. अधिकार्यांना जेलमध्ये टाकू अशा धमक्या देत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही संघर्षातून आलो आहे. अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. लाडक्या बहिणीसाठी एकदा नाही तर शंभरवेळा जेलमध्ये जायला तयार आहे. आमचं ठरलय आता वारं फिरलयं... असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही...

कोल्हापूर, सांगलीतील पूर नियंत्रणासाठी 3200 कोटींचा प्रकल्प सुरू आहे. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी निधी दिला आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोल्हापूरकरांनी महायुतीचे दहाही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडूण द्यावेत, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. खा. धैर्यशील माने, आ. जयश्री जाधव,आ. प्रविण देरेकर, प्रसाद लाड, सुमित कदम, सौ. शौमिका महाडीक, माजी खा. संजय मंडलिक, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा.शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, नंदकुमार गोंधळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राहूल चिकोडे, भैय्या माने, आदिल फरास आदी उपस्थित होते. आभार खा. धनंजय महाडिक यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT