कोल्हापूर : गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झाले. नाट्यगृहाच्या पाठीमागे असलेल्या कुस्ती आखाड्याच्या स्टेजचे शुक्रवारी असे अवशेष दिसत होते. Pudhari File Photo
कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृह आगीची चौकशी : मुख्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अभिमानाने मिरवणार्‍या, कोल्हापूरकरांचा मानबिंदू असलेल्या, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. चौकशी करून दोषींवर कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले. त्यावर महापालिकेने चारसदस्यीय समिती स्थापन केली. ही समिती तातडीने अहवाल देणार आहे. दरम्यान या आगीविषयी कोल्हापूरकरांच्या मनात ‘संशयकल्लोळ’ सुरू असून याप्रकरणी फॉरेन्सिक तपासाचीही मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत शुक्रवारी सांयकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत तमाम कोल्हापूरकरांची आणि कलाप्रेमींची अस्मिता असलेले केशवराव भोसले नाट्यगृह या आगीत भस्मसात झाले. शुक्रवारी सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी याप्रकरणी चौकशीचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही के. मंजुलक्ष्मी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले. केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे करू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी घेतली तातडीची बैठक

महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी दुपारी तातडीची बैठक घेऊन संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी चारसदस्यीय समितीची घोषणा केली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे आणि मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश समितीला के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. त्यानुसार समितीने तत्काळ चौकशीलाही सुरुवात केली असून येत्या दोन दिवसांत अहवाल दिला जाईल, सांगण्यात आले. दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कुस्ती मैदान आखाड्याच्या स्टेजला सर्वप्रथम आग लागली होती. ही आग या ठिकाणी असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. यामुळे या आगीची सर्व अंगाने चौकशी होण्याची शक्यता आहे.

हा घात होता की अपघात, याची चौकशी व्हावी

नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कुस्ती आखाड्याच्या स्टेजला लागलेली ही आग नाट्यगृहात शिरली आणि अवघ्या काही वेळात नाट्यगृह आगीत भस्मसात झाले. सध्या पावसाळी स्थिती आहे. आग ज्या भागात लागली, तो परिसर पाहता आजूबाजूला जागा ओलसर आहे. तरीही मोठ्या प्रमाणात आग भडकली आणि केशवराव भोसले नाट्यगृहाला गिळंकृत केले. याबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्क केले जात आहेत. या परिसरात अनेक मद्यपींचा वावर असतो. त्यातून या स्टेज परिसरात बसलेल्यांपैकी कुणाकडून हा प्रकार झाला का, बिडी-सिगारेटसारख्या वस्तू त्याच ठिकाणी टाकल्याने ही आग लागली का, खरोखर शॉर्टसर्किट झाले का, तसेच काही झाले असेल तर त्याची तपासणी नियमित होत नव्हती का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा घात होता की अपघात, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही जोर धरत आहे.

फॉरेन्सिक तपासणी करा

याप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी करा, अशी मागणी करत तपासणी होत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू हलवू नका, यामुळे गुन्ह्यातील पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याची भीती प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले. हे नाट्यगृह संस्थानकालीन होते आणि कोल्हापुरातील हेरिटेज म्हणून नोंद होते. शाहूकालीन वास्तूपैकी ही एक वास्तू असून कोल्हापुरातील शाहू राजांच्या वास्तू व वारसा हळूहळू नष्ट करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी शासनाने निधी दिला, तो खर्चही झाला. या खर्चाबाबत अनेकांनी साशंकता व्यक्त करत झालेला खर्च दाखवण्याची मागणी केली होती. त्यामुळे या आगीमागे घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप करत याबाबत गुन्हा नोंद व्हावा आणि फॉरेन्सिक तपास करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.

आगीवरून संशयकल्लोळ

केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीवरून आता कोल्हापूरकरांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. आग कशी लागली याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी याप्रकरणी फॉरेन्सिक तपास व्हावा, अशी मागणी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आगीची ही घटना घात आहे की अपघात याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही होत आहे.

नाट्यगृहाचे 16 कोटींचे नुकसान

या आगीत नाट्यगृहाचे सुमारे 16.20 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाट्यगृहाचा महापालिकेने विमाही उतरवला आहे. त्यानुसार साडेसात कोटी रुपयांचा दावाही संबंधित विमा कंपनीकडे करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT