इचलकरंजी : येथील विकासपर्व सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी माजी आ. सुरेश हाळवणकर, आ. राहुल आवाडे, माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खा. धनंजय महाडिक आदी.  Pudhari File Photo
कोल्हापूर

‘अलमट्टी’ उंची वाढवू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुराचे पाणी वळविण्यासाठी लवकरच निविदा

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला महाराष्ट्राचा विरोध आहे. या प्रश्नाकडे आमचे लक्ष असून, वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात लढाई लढू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जागतिक बँकेच्या सहकार्यातून दुष्काळी भागात पाणी वळविण्याच्या प्रकल्पाची निविदा येत्या 15 दिवसांत काढण्यात येणार आहे. यामुळे महापुराचा प्रश्न उद्भवणार नाही, असा निर्वाळाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

इचलकरंजी शहरातील 700 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या विकासपर्व सभेत ते बोलत होते. महापुरामुळे राज्यातील 150 टीएमसी पाणी थेट समुद्रात मिसळते. तेच पाणी दुष्काळी भागात वळविल्यास अर्ध्या महाराष्ट्राचा दुष्काळ दूर होईल. त्यासाठी पथदर्शी योजना राबवू. शाश्वत विकासासाठी सरकार प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे. सहा महिन्यांत पारदर्शी कारभारासाठी राज्य सरकारने 100 दिवसांचा कार्यक्रम राबवताना सर्व कार्यालये गतिमान व लोकाभिमुख केली. आता पुन्हा तीन टप्प्यांत 150 दिवसांचा कार्यक्रम राबवत विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2029 मध्ये उद्दिष्टांचा आराखडा तयार केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

2035 मध्ये राज्याला व जनतेला काय देणार, हे निश्चित करून विकसित महाराष्ट्र निर्माण करू. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्य सरकार व त्यांच्या उपक्रमांच्या ऑनलाईन सेवा देताना पुढच्या टप्प्यात आवश्यक ते सर्व दाखले नागरिकांना व्हॉटस्अ‍ॅपवर मिळण्याची सुविधाही देऊ. पारदर्शकता, प्रामाणिकता आणि गतिशीलता या माध्यमातून प्रगतशील, शाश्वत कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राला नंबर वन बनवू, असे फडणवीस म्हणाले. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. भारताकडे वाईट नजरेने बघणार्‍यांना जशास तसे उत्तर दिले जाईल हे दाखवून दिले. बहिणींचे कुंकू पुसले तर आम्ही घरात घुसून मारू, हा नवा भारत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पाकिस्तानने ड्रोन पाठवून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, 500 हून अधिक ड्रोन आपल्या सैन्याने हवेतच उडवले. त्यांची क्षेपणास्त्रेही पाडली. या युद्धात ‘मेक इन इंडिया’ची सामग्री यशस्वी ठरली. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणाला जाते. आ. डॉ. राहुल आवाडे यांनी स्वागत केले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आ. प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे, खा. धनंजय महाडिक, आ. शिवाजी पाटील, मकरंद देशपांडे, विजय जाधव, स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, महेश जाधव आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT