भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने सन्मान करणार 
कोल्हापूर

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने सन्मान करणार

बार असोसिएशन, सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी महत्त्वपूर्ण भूमिका घेणारे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा बार असोसिएशन व सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

तब्बल 40 वर्षे सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. या अथक संघर्षानंतर कोल्हापूरच्या वाट्याला सर्किट बेंच आले आहे. सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा हा ऐतिहासिक सोहळाच आहे. कोल्हापूरकरांनी तो आनंदोत्सव म्हणूनच साजरा करावा. उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी गेली 40 वर्षे अव्याहत लढा सुरू होता. त्याला यश आले आहे. दि. 17 रोजी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील सर्किट बेंचच्या इमारतीचे उद्घाटन होणार असून, शुभारंभ सोहळा मेरी वेदर मैदानावर रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात बार असोसिएशन व सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली.

बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. माजी महापौर आर. के. पोवार, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने, अशोक भंडारे, कॉ. दिलीप पोवार, सुभाष जाधव, भाई बाबुराव कदम, महेश जाधव, रविकिरण इंगवले, प्रा. अनिल घाटगे, सुनील मोदी, वसंतराव मुळीक यांनी मते मांडली. कोल्हापुरात येणार्‍या पक्षकार व वकिलांना राहणे-खाण्याची सुविधा योग्य दरातच होईल. फ्लॅट, कार्यालयांचे भाडे वाढणार नाही, अशी ग्वाही संबंधितांनी यावेळी दिली. प्रलंबित खटले मार्गी लागतील. सर्वसामान्यांना जलद न्याय मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. शिवाजी राणे, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. श्रीकांत जाधव, बारचे उपाध्यक्ष अ‍ॅड. टी. एस. पाडेकर, मनोज पाटील, सूरजकुमार भोसले, प्रमोद दाभाडे, विजय ताटे-देशमुख आदींसह सचिन शानभाग, रामराजे बदाले, किशोर घाटगे, धनंजय दुग्गे, अरुण चोपदार, किसन कल्याणकर, डी. जी. भास्कर आदींसह वकील आणि सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT