पुढारी ऑनलाईन डेस्क - संगमेश्वरातील (जि. रत्नागिरी) कसबा हे छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेलं गाव आहे. याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. कसब्यामध्ये प्रवेश करताच हे स्मारक लक्ष वेधणारं आहे. गाव तसं खूप जुनं. अनेक वाडे आणि अस्सल कोकणी पद्धतीची घरे असणारे हे गाव तुम्हाला इतरत्र कुठेही दिसणार नाही. नक्षीदार जाळ्यांनी सजलेल्या वाड्यांच्या दारे-खिडक्या, जुन्या लाकडांच्या खांबांनी सजलेल्या भिंती, चबुतरे, चिरेबंदी घरे मजली - दुमजली करत सलग पाहता येतात. जाडजूड भिंती अन् चिंचोळ्या रस्त्याने कसबा गावात जाता येतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आजही इथे इतिहासाची साक्ष देणारी आहे. महाराजांचा त्याग, शक्ती, आणि अलौकिक शौर्याचा वारसदार म्हणून साक्ष देत जागणारं गाव म्हणजे कसबा पेठ संगमेश्वराची ओळख आहे. जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर आणि परिसरातील विविध ठिकाणांबद्दल.
रत्नागिरी जिल्ह्यात कसबा पेठ संगमेश्वर अशी ओळख असलेले गाव. येथे स्वराज्याचे रक्षक छ. संभाजी महाराज यांना फंद फितुरीने कैद करण्यात आले होते. या गावात संगमेश्वर अन् चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर ही प्राचीन मंदिरे कोकण भूमीला इतिहासाची सुंदर किनार प्रदान करतात. याच गावात 'अलकनंदा' आणि 'वरुणा' या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले 'कसबा संगमेश्वर' कोकणाला सुंदर वलय प्राप्त करून देतात. याच संगमेश्वरला 'देवळांचे गाव' असेही म्हटलं जातं. कसबा, कर्णेश्वर, सप्तेश्वर अशा ठिकाणांना तुम्ही आवर्जुन भेट द्या.
संगमेश्वर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई – गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेनेदेखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास 'रामक्षेत्र' असेही म्हटले जाते.
संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिद्ध महादेव मंदिर आहे.
हे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कर्णेश्वराचे मंदिर हे काही जण कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासक म्हणतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे.
प्राचीन जल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणजे सप्तेश्वर मंदिर होय. जंगलातून जाणाऱ्या या मार्गावर दुचाकी घेऊन जाणे अधिक सोईस्कर ठरेल. कसबा गावातून ४ कि.मी. अंतरावर शंकराचे मंदिर आहे. याठिकाणी गेल्यानंतर पाण्याचे मोठे कुंड आणि सभोवताली सात कमानी पाहायला मिळतात. बारा महिने या कुंडात स्वच्छ पाणी पाहायला मिळतात.
या कुंडात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह या सात कमानींमधून येतो म्हणूनच या मंदिराला सप्तेश्वर असे नाव पडले असावे.
संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी होते. विशाळगडाहून रायगडला जाताना १ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आल्याची नोंद आहे. या वाड्यात महाराजांविषयी दुर्देवी घटना घडली होती. आजही या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि. मी. अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि. मी. अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३० मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. संगमेश्वराहून रत्नागिरी, लांजा आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.