कोल्हापूर : नोटबंदीसारखी आता चेकबंदी केली आहे का? ऐन दिवाळीत धनादेश चार-पाच दिवस झाले तरी वटत नसल्याचे चित्र आहे. व्यापार्यांनी दिवाळी करायची की नाही, असा सवाल चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने करण्यात आला. धनादेश वटण्याची प्रक्रिया सुरळीत करा, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना गुरुवारी देण्यात आले.
रिझर्व्ह बँकेने एकाच दिवसात धनादेश वटविण्याची प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी 4 ऑक्टोबरपासून करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले. यामुळे धनादेश ज्या दिवशी बँकेत जमा केले त्याच दिवशी ते वटणार असल्याने, व्यापार-उद्योग जगतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, नव्या नियमामुळे धनादेश वटविण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली असून अनेक खातेदारांची रक्कम वेळेत जमा न झाल्याने व्यापारी-उद्योजकांमध्ये तीव— नाराजी आहे.
यापूर्वी धनादेश वटण्यासाठी दोन ते तीन दिवस जात होते. मात्र नवीन नियमानुसार धनादेश ज्या दिवशी जमा होईल, त्याच दिवशी तो क्लिअर करून होणे आवश्यक आहे. या नवीन प्रणालीसाठी पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने आणि तांत्रिक साधनांची कमतरता असल्याने अनेक बँकांचे अंतर्गत नियोजन कोलमडले आहे. धनादेश वटण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा अवधी लागत आहे.
एका दिवसात धनादेश वटण्याच्या आशेने व्यापारी उद्योजकांनी बँकेत धनादेश जमा केले आहेत. त्यामुळे प्रणालीवर ताण आला आहे. याचबरोबर अनेक तांत्रिक अडचणी या प्रक्रियेत येत असल्याने व्यापारी-उद्योजकांचे आर्थिक व्यवहार अडकले आणि थांबले आहेत. यामुळे सध्या दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर असूनही रोख रक्कम उपलब्ध होणेस मर्यादा आल्या आहेत. यामुळे धनादेश एकाच दिवसात वटविणेबाबत बँकांना आदेश द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे,अजित कोठारी, जयेश ओसवाल,राहुल नष्टे, संपत पाटील आदींचा समावेश होता. दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांच्याशी चर्चा केली.