कोल्हापूर : मुंबई पोलिस, महसूल खात्यात नोकरीच्या बहाण्याने मुंबईतील दाम्पत्याने कोल्हापूर व बेळगाव येथील तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. जुना राजवाडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली. समीर दगडू पाटील (49) व सुचिता समीर पाटील- म्हेसाणे (43, रा. विरार पूर्व, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित समीरने आपण मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असल्याचा बनाव केला होता. त्याच्या भपकेबाज वागण्याला भुलून कोल्हापूरसह परिसरातील अनेक सुशिक्षित, बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. शिवाजी पुंडलिक सुतार (53, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत संशयित समीर पाटील व त्याच्या पत्नीने स्वत:सह सहकारी अभिजित देशमुख यांची एकूण 15 लाख 55 हजार 920 रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. 24 ऑक्टोबर 2018 ते 14 एप्रिल 2022 या काळात हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी शिवाजी पाटील यांनी संशयितांविरुद्ध यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील पालघर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र चौकशीत संशयितांचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे पाटील यांनी 21 डिसेंबरला रात्री येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोबाईल लोकेशनद्वारे संशयित समीरने दोन दिवसांपासून महाद्वार रोडवर एका लॉजवर वास्तव्य केल्याचे उघड झाले.
पोलिस उपनिरीक्षक अपर्णा जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथकाने रविवारी रात्री उशिरा लॉजवर छापा टाकून संशयिताला अटक केली. सोमवारी दुपारी त्याची पत्नी सुचिता हिला ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. बुधवारपर्यंत त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. संशयितांनी सुतार, देशमुखसह कोल्हापूर येथील वैद्य नामक तरुण आणि बेळगाव येथील काहींची फसवणूक केली आहे. संबंधितांनी राजवाडा पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला आहे, असेही लोंढे यांनी सांगितले.