Silent heart attack | बदलत्या हवामानाचा हृदयावर ‘सायलेंट अटॅक’! 
कोल्हापूर

Silent heart attack | बदलत्या हवामानाचा हृदयावर ‘सायलेंट अटॅक’!

उष्णता, प्रदूषण, जीवनशैली बदलाचा बसतोय दुहेरी फटका

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : बदलते हवामान, वाढता उष्मा आणि प्रदूषणाचा घाला आता थेट मानवी आरोग्यावर होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाढती उष्णता, प्रदूषण आणि आर्द्रतेमुळे कमी अधिक प्रमाणात रक्तदाबात चढउतार होऊन हृदयावर अतिरिक्त ताण येत आहे. हवामान बदल हा हृदयासाठी ‘सायलेंट किलर’ ठरत असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या स्टेट अ‍ॅक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज अँड ह्युमन हेल्थ या अहवालात स्पष्ट सांगण्यात आले आहे.

राज्य सरकाच्या अहवालानुसार, हृदयविकाराच्या रुग्णसंख्येतही मोठी वाढ दिसून येत आहे. 2023-24 मध्ये 20 हजार दोन असलेले हृदयविकाराचे रुग्ण 2024-25 मध्ये वाढून 31 हजार 9 पर्यंत पोहोचले आहेत. अर्थात या रुग्णवाढीला बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, इतर व्याधीही जबाबदार आहेत. मात्र, यासाबोतच बदलत्या हवामानाचा सायलेंट धोका देखील तितकाच आहे. तापमान वाढल्याने हवेत ओझोन आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण वाढते. यामुळे हृदय व श्वसनाचे आजार तीव— होतात. तसेच उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होऊन रक्त घट्ट होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

प्रदूषणाचा होतोय घातक परिणाम

हवेत वाढणारे सूक्ष्म प्रदूषक पीएम 2.5 आणि ओझोन हे थेट रक्तवाहिन्यांवर परिणाम करतात. हे कण शरीरात जाऊन सूज निर्माण करतात आणि रक्तवाहिन्या अरुंद करतात. त्यामुळे ब्लॉकेज तयार होण्याचा धोका वाढतो. याचा थेट परिणाम हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर हृदयविकारांवर होतो.

उष्णता आणि हृदय

उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्त घट्ट होते आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे हृदयाला अधिक जोरात आणि वेगाने काम करावे लागते. परिणामी रक्तदाब वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

वाढती उष्णता : शरीरातील पाणी कमी होऊन रक्त घट्ट होते व रक्तदाब वाढू शकतो.

प्रदूषण (पीएम 2.5) : रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण होऊन त्या अरुंद होतात.

ओझोन वायू : हृदय आणि श्वसनाचे आजार अधिक तीव्र करतो.

आर्द्रता : शरीरातील नैसर्गिक थंडावा कमी करून हृदयावर ताण वाढू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT