कोल्हापूर : विजयी सभेत बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. यावेळी उपस्थित वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर आदी. (छाया: मिलन मकानदार 
कोल्हापूर

Kolhapur Chandrakant Patil warns Satej Patil | मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले तर तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आमदार सतेज पाटील यांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुसते डोळे जरी वटारले तरी तुमचे साम्राज्य एक दिवसात उद्ध्वस्त होईल. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी आपल्याला फक्त एक आदेश द्यावा, बंटी पाटील यांचे काही शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा भाजपचे नेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांना मंगळवारी दिला. मुख्यमंत्र्यांवरच बोलता आणि त्यांच्याकडे जाऊन कामे करून घेता. तुमच्यात धमक असेल तर यापुढे त्यांच्या केबिनमध्ये काम घेऊन जाऊ नका. फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत, भल्याभल्यांना त्यांनी गारद केले, त्यांच्या नादाला लागू नका, तुम्हाला तुमची जागा कधी दाखवून दिली हे देखील कळणार नाही, असेही त्यांनी सुनावले.

गोकुळ अध्यक्ष निवडीनंतर गोकुळ शिरगाव येथे झालेल्या विजयी सभेत मंत्री पाटील यांनी आ. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. तुमचे वडील स्वर्गीय डी. वाय. पाटील या शहरात स्कूटरवरून फिरायचे, मग आता तुमची प्रॉपर्टी किती आहे, ते जाहीर करा. ती कुठून आली, असा सवाल करत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना गोकुळ संघ आपल्या नावाने करायचा. कुटुंबात त्यांना इतरांपेक्षा सर्वांत श्रीमंत व्हायचे, या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडले आहे.

सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना धमकी दिली होती, असा आरोप करत मंत्री पाटील म्हणाले, २०१९ मध्ये जनादेश आमच्या बाजूने असतानाही शरद पवार यांच्या सांगण्यावरून पाटील जयपूरला जाऊन बसले. शिवसेनेसोबत सरकार केले नाही तर आम्ही ४० जणांना घेऊन बाहेर जाऊ, असे म्हणत त्यांनी सोनिया गांधींना धमकी दिली होती. याचे सर्व रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत, असे सांगत तो जनादेशाचा अनादर नाही का? इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली, घटनाच बदलली, त्यावेळी लोकशाहीचा खून झाला नव्हता का? आता तुमची दादागिरी चालणार नाही, असे सांगत हे अद्याप बेटीच आहेत, ते बेटी साहेब झाले नाहीत. एखादे लहान मूल खेळण्यासाठी प्रागा करते, असा त्यांचा प्रकार गेले १५ दिवस सुरू होता, असा टोलाही त्यांनी लगावला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्ये यांना केवळ ४ हजार ९०० मते मिळाली, त्यावर राज्यात परिवर्तन करायला चालले. जर मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढला नसता तर हे निवडून आलेले १३ लोक घरी बसले असते आणि प्रशासक आला असता. निवडलेल्या २५ जणांच्या हाती कारभार राहावा म्हणून हा अध्यादेश काढला. गोकुळमध्ये त्यांनीही निवडणुका लढवल्या, आम्हीही लढवल्या. पण हे खरे आहे की, आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर सत्ता आली. पण तुम्ही एवढे मोठे झाला की, माझा हात धराल, असा सवाल करत २०१६ च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण आणि विनय कोरे यांनी ठरवले म्हणून तुम्ही विजयी झाला. कुणाचा हात धरून तुम्ही विधान परिषदेत गेला? आम्ही नसतो तर तुम्ही त्यावेळी मंत्रीही नसता, असा टोला लगावत ज्यांनी मदत केली, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा नसतो. गोकुळच्या निमित्ताने आरोप केले, टीका केल्या, पण 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी' असतात हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, गोकुळच्या अध्यक्ष निवडीत कोरममुळे अभूतपूर्व पेच निर्माण झाला होता. यामुळे भविष्यकाळात ही संस्था सुरक्षित पद्धतीने लोकांच्या हितासाठी काम करत राहणे आवश्यक असल्याने सरकारने अध्यादेशाचा निर्णय घेतला.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सतेज पाटील यांनी सप्तगंगा कारखान्यातील सभासद बाहेर काढून तो साखर कारखाना बळकावला, मौनी विद्यापीठही अशाच प्रकारे ताब्यात घेतले. मंत्री असूनही टोलची पावती फाडली, अशी अनेक पापे त्यांनी केली आहेत. आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, कोरमअभावी सभा तहकूब झाल्यास प्रशासक नेमण्याचा कायदा काय आम्ही केलेला नव्हता. आमचे संचालक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहेत, ते तुमचा अध्यक्ष निवडून देण्यासाठी नाही. मुख्यमंत्र्यांनी मनात आणले असते तर याच १२ जणांना पुन्हा प्रशासक मंडळावर आणले असते. आमच्यापेक्षा एक जागा जादा जिंकून कोणी महाराष्ट्र जिंकला असे म्हणत असेल तर परमेश्वर कुणाच्या बाजूने आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुजित मिणचेकर यांचीही भाषणे झाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT