शिरोळ : येथे गोकुळ निवडणुकीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी बैठक घेतली. 
कोल्हापूर

Chandrakant Patil | गोकुळ निवडणुकीसाठी 2 हजार ठराव गोळा करा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या निवडणुकीसाठी भाजपचे म्हणून 2 हजार दूध संस्थांचे ठराव गोळा करा, अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच गोकुळमध्ये परिवर्तन घडवून दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी महायुती कटिबद्ध राहील, असा विश्वास देत गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रेसिडेन्सी क्लब येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेत गोकुळ निवडणुकीसाठी छ. शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा केली. यानंतर रविवारी दुपारी मंत्री पाटील यांनी शिरोळ येथे भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांची बैठक घेत निवडणुकीसंदर्भात विविध सूचना केल्या.

मंत्री पाटील म्हणाले, गोकुळ निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढायची आहे. निवडणुकीसाठी आघाडीची घोषणाही झाली आहे. मंगळवारपासून ठराव गोळ करण्याची प्रक्रिया सुरू होईल. महायुतीमधील सर्वच घटक पक्ष आपापल्या ताकदीने ठराव गोळा करणार आहेत. त्यामुळे भाजपकडेही ठरावांची लक्षवेधी संख्या असणे आवश्यक आहे. किमान 2 हजार दूध संस्थांचे ठराव भाजपकडे कसे येतील याचे नियोजन करा, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

खा. धनंजय महाडिक म्हणाले, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. आता गोकुळची निवडणूकही महत्त्वाची आहे. निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढायची आहे. भाजपकडे जास्तीत जास्त ठराव कसे येतील यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन खा. महाडिक यांनी केले. बैठकीला माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, आमदार राहुल आवाडे, समरजितसिंह घाटगे, गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक, अंबरिष घाटगे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई आदी उपस्थित होते.

एकदिलाने काम करा

गोकुळ निवडणुकीसाठी सर्व नेते, प्रमुख पदाधिकारी यांनी एकदिलाने एकत्र येत काम करावे. प्रत्येक नेता, पदाधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील दूध संस्थांचे ठराव भाजपकडे मोठ्या संख्येने येतील यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे आता ठराव गोळा करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी बैठकीत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT