कोल्‍हापूर : महायुतीच्‍या प्रचार प्रारंभ मेळाव्‍यात छ. शाहू शेतकरी विकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्‍यात आला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोकराव माने आदी उपस्‍थित होते.  
कोल्हापूर

Gokul Election| काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सतेज पाटील यांना इशारा; ‘गोकुळ’च्या प्रचार प्रारंभ मेळाव्यात महायुतीचा हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : ‘‘गोकुळच्‍या मागील निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात सत्तेचा वापर करत इच्‍छा नसताना अनेकांना पॅनेलमध्‍ये येण्‍यास भाग पाडले. त्‍यावेळीही तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाेकुळचे अनेक निर्णय मुंबईतून घेतले. त्‍यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत’’, असा इशारा उच्‍च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. सतेज पाटील यांना दिला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही ‘गोकुळ’मधील हस्तक्षेपाचा इतिहास उकरून काढत आ. पाटील यांच्यावर निशाणा साधला.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या छ. शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार प्रारंभ मेळावा शहरातील महासैनिक दरबार हॉल येथे रविवारी झाला. यावेळी महायुतीच्या नेत्‍यांनी आघाडीचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. प्रास्‍ताविक करताना माजी संचालक अजित नरके यांनी गोकुळ फर्स्ट याच भावनेतून महायुतीचे काम सुरू असल्‍याचे सांगितले.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतूनच निर्णय घेतले जात होते. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे.’’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मध्यस्थी केली; मात्र त्यांच्या मुलीला संचालक व्हायचे नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सतेज पाटील गोकुळ अमूलच्या दावणीला बांधल्याचा आरोप करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीला अडीच वर्षे, तर विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत याचे भान त्यांनी ठेवावे, असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,‘‘पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलीप पाटील यांना ‘गोकुळ’चे अध्यक्ष करण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी सतेज पाटील हे गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे ‘गोकुळ’च्या कारभारातील राजकीय हस्तक्षेपाची सुरुवात तत्‍कालीन मुख्‍यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळापासून झाली .पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, सोशल मीडियावरील बुद्धिभेद आणि अफवांच्‍या राळेला ठरावधारक भुलणार नाहीत. महायुतीचे सर्व उमेदवार निवडणुकीत विजयी होतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

आमदार विनय कोरे म्हणाले, गोकुळमध्ये महायुती म्‍हणून एकत्र येताना अनेक मतभेद होते. पन्हाळ्यात आ. चंद्रदीप नरकेंसोबत आमचा तीव्र संघर्ष आहे. पण, या संघर्षाचा गोकुळमध्‍ये कोठेही फटका बसणार नाही, याची दक्षता आम्‍ही घेतली आहे. अंतर्गत ईर्ष्या, मानपान आणि मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्‍याचे आम्‍ही ठरवले आहेे.

जिल्‍हा बँकेचा अध्‍यक्ष महायुती विचाराचा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकही आम्‍ही महायुती म्हणूनच लढवणार आहे. पण, यंदा मी अध्यक्ष होणार नसून बँकेचा अध्‍यक्ष महायुतीच्या विचाराचा असेल, असे सूचक वक्‍तव्‍य मंत्री मुश्रीफ यांनी केले. यावेळी खा. धनंजय महाडिक, आ. चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोकराव माने, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आ. संजय घाटगे, के. पी. पाटील, सुरेश हाळवणकर, समित कदम, समरजित घाटगे, ए. वाय. पाटील आदी उपस्‍थित होते. सतीश पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT