सांगरूळ : माझ्या निष्ठेवर जाऊ नका, मी आजपर्यंत धनुष्यबाण या चिन्हावरच सर्व निवडणुका लढविल्या आहेत. जिल्ह्यात पैशाचे आणि हुकूमशाहीचे राजकारण यापुढे चालणार नाही, असा इशारा महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला. वाकरे (ता. करवीर) येथे प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रय पाटील -सावकार होते.
मी शांत आहे, या शांततेचा अंत पाहू नका, झूंडशाहीला मतदार बळी पडणार नाहीत. गेली 37 वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रांत सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे काम केले आहे. माझे कुटुंब म्हणून मी करवीर विधानसभा मतदारसंघाला वेळ दिल्याने आत्मसन्मान दुखावण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील म्हणाले, कुंभी कारखान्याने शेतकर्यांची बिले आणि सवलतीची साखर वेळेवर दिली आहे. भोगावती कारखान्याने सवलतीच्या साखरेत हात मारला आहे. कुंभी कारखाना संचालक अनिल पाटील म्हणाले, नरके यांनी मतदारसंघाचा भरीव विकास केला. संचालक बी. बी. पाटील म्हणाले, केंद्र व राज्य लोककल्याणकारी योजना नरके यांनी तळागाळापर्यंत पोहोचविल्या. यावेळी डॉ. के. एन. पाटील, हंबीरराव पाटील, बाळासाहेब वाशीकर, कुंभी बँक संचालक प्रा. एस. पी. चौगले, आकाश कांबळे, दादासाहेब देसाई, सचिन पाटील, विलास पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. सरपंच अश्विनी पाटील, लक्ष्मण पाटील, परशुराम कांबळे, विठ्ठल पाटील वस्ताद, सर्जेराव शिंदे, डॉ. आनंद गुरव, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, संजय पाटील, संदीप कांबळे, सचिन पाटील, नवनाथ पोवार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. बी. एल. पाटील यांनी केले. आभार मारुती बिरंजे यांनी मानले.