विशाळगड : सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात दडलेल्या जैवविविधतेचा आणखी एक अनमोल ठेवा उजेडात आला आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात श्रीलंकन फ्रॉगमाऊथ अर्थात ‘मंडूकमुखी’ या दुर्मीळ निशाचर पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. तब्बल सात ते आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पक्ष्याचे दर्शन घडले असून, नर आणि मादीच्या आवाजांसह त्याचे छायाचित्र टिपण्यात पक्षी अभ्यासकांना यश आले आहे.
चांदोली बर्डविंग इको टुरिझमचे संस्थापक व नॅचरलिस्ट प्रणव महाजन आणि वन्यजीव छायाचित्रकार शिवम खाडे पक्षी निरीक्षणासाठी जंगलात गेले असताना हा अनमोल ठेवा त्यांच्या नजरेस पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून चांदोली परिसरात या पक्ष्याच्या अस्तित्वाचा शोध सुरू होता. आंबा आणि कोयना परिसरात त्याच्या नोंदी झाल्या होत्या; मात्र चांदोलीत त्याची अधिकृत नोंद झाली नव्हती. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात निरीक्षणादरम्यान अचानक पावसाने हजेरी लावली. पाऊस थांबल्यानंतर अंधाराच्या साक्षीने जंगलातून घुमलेला वेगळाच आवाज प्रणव महाजन यांनी अचूक ओळखला. तो श्रीलंकन फ्रॉगमाऊथचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नर आणि मादीच्या आवाजांची नोंद करण्यात आली.
प्रत्यक्ष दर्शनासाठी पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन जवळपास तासभर प्रतीक्षा करावी लागली. अखेर या अथक प्रतीक्षेला यश आले आणि दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन घडले. त्याचे छायाचित्रही टिपण्यात आले. परिसरात या पक्ष्यांच्या दोनपेक्षा अधिक जोड्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
झाडाच्या सालीत मिसळणारे वैशिष्ट्यपूर्ण रूप!
साधारण २२ ते २३ सेंटीमीटर लांबीचा हा पक्षी निशाचर असून दिवसा घनदाट जंगलात विश्रांती घेतो. नराचा रंग वाळलेल्या लाकडाच्या सालीसारखा राखाडी, तर मादीचा बदामी असतो. बेडकासारखी चोच आणि चेहऱ्याची ठेवण यामुळे त्याला मंडूकमुखी संबोधले जाते. चांदोलीच्या जंगलातील ही नोंद म्हणजे केवळ एका दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन नव्हे, तर सह्याद्रीच्या गर्भात आजही अनेक अज्ञात जैविक संपत्ती दडलेली असल्याची साक्ष आहे.