सुभाष पाटील
विशाळगड : चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील घनदाट अरण्यात सध्या वन्यजीवांच्या मुक्त संचाराने जंगल सफारीला नवी रंगत आली आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील चांदोली जंगल सफारीदरम्यान सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तब्बल १५ ते २० रानकुत्र्यांचा कळप पर्यटकांच्या नजरेस पडला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रानकुत्र्यांचे दर्शन घडल्याने पर्यटकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला. पर्यटकांनी या दुर्मीळ वन्यजीव दर्शनाचे छायाचित्रणही केले. यावेळी नॅचरलिस्ट प्रणव महाजन उपस्थित होते.
रानकुत्रे अर्थात 'ढोल' किंवा 'कोळशिंदा' हे जंगलातील प्रभावी शिकारी वन्यप्राणी म्हणून ओळखले जातात. कळपाने राहणारे हे प्राणी समूहाने शिकार करतात. जंगलातील अन्नसाखळीचा समतोल राखण्यात त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, अधिवासाचा ऱ्हास आणि अन्य धोक्यांमुळे या प्रजातीचा IUCN (International Union for Conservation of Nature) च्या लाल यादीत संकटग्रस्त म्हणून समावेश आहे.
ऑक्टोबरपासून जंगल सफारी सुरू झाल्यानंतर रानकुत्र्यांचे चार ते पाच वेळा विविध ठिकाणी दर्शन झाले आहे. बिबट्यांच्या दर्शनानेही पर्यटकांच्या उत्साहात भर पडली आहे. झोळंबी जंगल, विठ्ठलाई मंदिर, उदगिरी, शेवताई आणि गुढे परिसर वन्यजीव निरीक्षणासाठी पर्यटकांचे आकर्षण बनत आहेत.
सफारीसाठी सकाळची वेळ उत्तम! "चांदोली जंगल सफारीसाठी सकाळी सहा ते दहा आणि दुपारी दोन ते सहा ही वेळ उत्तम आहे. या वेळेत पर्यटकांना विविध वन्यप्राण्यांचे दर्शन होण्याची संधी असते."— ऋषिकेश पाटील, वनक्षेत्रपाल, चांदोली.
"ऑक्टोबरपासून रानकुत्र्यांचे चार ते पाच वेळा विविध ठिकाणी दर्शन झाले आहे. बिबटे आणि रानकुत्र्यांच्या दर्शनामुळे पर्यटकांचा सफारीकडे ओढा वाढत आहे."— प्रणव महाजन, नॅचरलिस्ट, चांदोली.