Warna River Flood Pudhari Photo
कोल्हापूर

चांदोली धरण तुडुंब; वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ, अनेक गावांचा संपर्क तुटला

Warna River Flood update: वारणा नदीने रौद्ररूप धारण केले असून,अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chandoli Dharan Warana River Water level updates

बांबवडे : वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी (दि.२७) सायंकाळी धरणातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवला

गेल्या चार दिवसांपासून शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वारणा नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने रविवारी, २७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता धरणातून होणारा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला. वक्र दरवाजांमधून पूर्वीच्या ११,९०० क्युसेकवरून १३,४४५ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वीजगृहातून १,६३० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सध्या एकूण १५,०७५ क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नदीकाठचे जनजीवन विस्कळीत

पाण्याचा विसर्ग वाढल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक लहान-मोठे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा तहसील आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि आवश्यक असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT