वारणावती : चांदोली धरणामध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. 
कोल्हापूर

Chandoli Dam | चांदोली धरण १०० टक्के भरले

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

पुढारी वृत्तसेवा

वारणानगर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे २०० गावांची पिण्याची व शेतीची तहान भागवणारे चांदोली (वारणा) धरण शनिवारी दुपारी चार वाजता १०० टक्के भरले. धरणात क्षमतेएवढा ३३.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे; मात्र अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस झाल्याने धरण भरण्यास प्राधान्य देण्यात आले होते.

वारणा धरण क्षेत्रात गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आजअखेर धरणात १५ टीएमसी कमी पाण्याची आवक झाली. गतवर्षी २० टीएमसी पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करून ३० सप्टेंबरला धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. वारणा धरणाची सध्याची पाणीपातळी ६२६.९० मीटर असून, एकूण पाणीसाठा ९७४.१९ दशलक्ष घनमीटर इतका आहे. चांदोली परिसरात यंदाच्या पावसाळ्यात आज अखेरपर्यंत २ हजार ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, धरणातील वीजनिर्मिती गृहातून सध्या १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून हे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. सांडव्यावरून सध्या विसर्ग बंद आहे. एकूणच धरण १०० टक्के भरल्यामुळे वर्षभराचा शेतीच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

धरणाची स्थिती...

पाणी पातळी : ६२६.९० मीटर

एकूण पाणीसाठा : ३३.४० टीएमसी

उपयुक्त पाणीसाठा : २७.५२ टीएमसी ( १०० टक्के)

गतवर्षीचा उपयुक्त साठा : २५.९८ टीएमसी (९४.४१ टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT