चंदगड : चंदगड तालुक्यात तीन दिवसापासून अवकाळी पाऊस अधून मधून पडत आहे. चंदगड शहर तसेच जांबरे धरण परिसराला मंगळवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजता अवकाळी पावसाने झोडपून काढले. यादरम्यान सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस पडला. त्यानंतर चंदगड शहर परिसरातील बाजारपेठ निर्मनुष्य झाली होती.
रविवारी माणगाव परिसरात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर मंगळवारी सकाळी कडकडीत ऊन तर सायंकाळी पुन्हा चंदगड परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. चंदगड शहरासह नाव्हेली, हिंडगाव, देसाईवाडी, आडूरे, कोकरे, किरमटेवाडी, उमगाव, जांबरे या जांबरे धरण क्षेत्रात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
चंदगड शहरातील बाजारपेठेत सायंकाळी नागरिकांची वर्दळ अचानक कमी झाली. सात पर्यंत पावसाची झिरमिर सुरू होती. या अवकाळी मुळे वातावरणात कमालीचा गारठा पसरला होता.