मृत साई शहापूरकर 
कोल्हापूर

Chandgad News : सेल्फीचा नाद बेतला जीवावर! दगडावरुन पाय घसरुन थेट कोसळला धबधब्यात: बेळगावच्या तरुणाचा मृत्यू!

तिलारी जवळील धबधब्यातील घटना, चंदगड पोलिसांत आकस्मिक मृत्‍यूची नोंद!

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : निसर्गरम्य तिलारी (ता. चंदगड) परिसरात हिंडलगा, बेळगाव येथून आलेल्या तरुण पर्यटकाचा सेल्फी काढत असताना दगडावरून पाय निसटल्याने धबधब्यात पडून मृत्यू झाला. साई सुभाष शहापूरकर ( वय १८, रा. पाइपलाइन रोड, विजयनगर, हिंडलगा, ता. जि. बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तिलारी नजीक कोदाळी (ता. चंदगड) येथील हॉटेल ग्रीन व्हॅली परिसरात ही घटना घडली. रविवारी (दि. २९) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साई हा आपल्या आई शुभांगी शहापूरकर व नातेवाइकांसह तिलारी परिसरात पर्यटनासाठी आले होते. यावेळी धबधब्याखालील दगडावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तो गेला असता, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. मात्र तो पाण्याबाहेर येऊ शकला नाही. पाण्यात बुडाल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेची फिर्याद साई याच्या आईने चंदगड पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सायंकाळी मृत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. अधिक तपास पोलीस हवालदार गोविंद जाधव करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT