चंदगड : चंदगड तालुक्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस अधूनमधून पडत आहे. चंदगड शहर, तसेच जांबरे धरण परिसराला मंगळवारी (दि. 24) सायंकाळी पाच वाजता अवकाळीने झोडपून काढले. यादरम्यान सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस पडला. त्यानंतर चंदगड शहर परिसरातील बाजारपेठ निर्मनुष्य झाली होती.
रविवारी माणगाव परिसरात अवकाळीने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवारी सकाळी कडकडीत ऊन, तर सायंकाळी पुन्हा चंदगड परिसरात अवकाळीने झोडपून काढले. चंदगड शहरासह नाव्हेली, हिंडगाव, देसाईवाडी, आडुरे, कोकरे, किरमटेवाडी, उमगाव, जांबरे धरण क्षेत्रात अवकाळीने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. चंदगड शहरातील बाजारपेठेत सायंकाळी नागरिकांची वर्दळ अचानक कमी झाली. सातपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. अवकाळीमुळे वातावरणात कमालीचा गारठा पसरला होता.