कुदनूर ः इसापूर (ता. चंदगड) येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी तथा सीएचओची नियुक्ती करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभा अधिवेशनात केल्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
चंदगड तालुक्याच्या पश्चिम-दक्षिण टोकावर सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्य सीमेवरील ऐतिहासिक किल्ले पारगड नजीकच्या इसापूर, नामखोल, पारगड, मिरवेल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरवण, पेंढारवाडी आदी गावांतील ग््राामस्थांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने वीस वर्षांपूर्वी इसापूर येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बांधण्यात आले होते. या परिसरामध्ये जंगली प्राण्यांचा वावर असल्याने सर्पदंश तसेच प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. याबरोबरच पारगड किल्ला व तसेच आंबोली, चौकूळ- इसापूर रस्ता झाल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे 24 तास आरोग्य सुविधा गरजेची आहे. या केंद्रात सुरुवातीची दोन-चार वर्षे येथे एक नर्स कार्यरत होती.
विधानसभेत यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इसापूर आरोग्य केंद्रासाठी समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्याची घोषणा केली. जाहिरात काढून नवीन निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कामगारी स्वरूपात नेमणुकीने तत्काळ सेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यामुळे गेली अनेक वर्षे आरोग्य सुविधांपासून वंचित राहिलेल्या गरीब गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे.