चंदगड : एका अल्पवयीन तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेत असताना पोलीस अधिकारी जवळ जाताच त्यांचा पाठलाग चुकवत संशयित आरोपी जवळच्या ऊस पिकातून पलायन केले. सदर घटना माणगाव ते पाटणे फाटा (ता. चंदगड) यादरम्यान गौळवाडी फाटा येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागरदळे (ता. चंदगड) येथील संशयित आरोपी प्रसाद मारुती सुतार याच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन तरुणीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोवाड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे तपास करत आहेत. संशयित प्रसाद सुतार हा गौळवाडी फाटा येथील एका चिकन दुकानात कामाला आहे. या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते.
ते जवळ जाताच आरोपी प्रसाद सुतार याने चिकन दुकानातून जवळ असणाऱ्या शेताच्या बांधावरून सखल भागात उडी मारली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे यांनीही पाठलाग केला. यादरम्यान ते पाय घसरून पडले. याचा फायदा घेत तो उसाच्या शेतातून पसार झाला, तो अद्याप गायब आहे. बेळगाव जिल्ह्यात तो लपून राहिला असून कोवाड पोलीस त्याच्या मागावर आहेत. सदर संशयित आरोपी प्रसाद सुतार याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरदळे ग्रामस्थातून होत आहे.
या गावात याआधीही रात्री अपरात्री अनेकांच्या घरावर दगडफेक होत आहे. त्यामध्ये कडलगे बुद्रुक येथील काही तरुणांचा सहभाग आहे. बेकायदा मद्य खरेदी व गांजा विक्रीत सहभागी तरुणांचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे चंदगडचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनीही पशार झालेल्या आरोपीला त्वरित ताब्यात घेण्याचे आदेश कोवाड पोलिसांना दिले आहेत. तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सुरू आहेत. आसगाव येथे एका तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. असे प्रकार वाढत असल्याने नागरदळे प्रकरणी पोलिस काय कारवाई करणार ? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.