चंदगड : चंदगड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या हेरे या गावाजवळ मोटनवाडी मार्गावर असलेल्या जंगलाशेजारी ताम्रपर्णी नदी जवळील उसाच्या शेतात दोन गव्यांची झुंज लागली होती. त्वेषाने लढताना ते दोघेही विहीरीत कोसळले व दोन्ही नर जातीच्या गव्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमीमधून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
घटनास्थळी चंदगड वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वनपाल भरत खुटाले यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी दाखल होत सदर दोन मृत गव्यांना क्रेनच्या सहाय्याने गुरुवारी सायंकाळी बाहेर काढण्यात यश आले. सदर दुर्घटना गुरुवारी पहाटे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. हेरे येथील विलास पांडुरंग गावडे या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतातील विहिरीत ही दुर्घटना घडली. ते गुरुवारी (दि. २६) सकाळी ऊस पिकाला विहिरीचे पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीची फ्यूज पेटी ही विहिरीत पडली असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर त्यांच्या लक्षात आले की, या विहिरीत झटापट करत दोन गवे पडले आहेत. यानंतर त्यांनी वनखात्याला ही माहिती देताच घटनास्थळी चंदगड येथून क्रेन मागवण्यात आली. वनरक्षक रणजित पाटील, सादीया तांबोळी, वनसेवक नितीन नाईक, गुंडू देवळी, बुधाजी कांबळे, चंदगडचे हत्ती हाकारा गटाचे कर्मचारी यांनी दोन्ही मृत गव्यांना विहिरीबाहेर काढले. चंदगड येथील पशुसंवर्धन खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. टी. लोकरे व डॉ. ईर्तीजा नाईक यांनी शवविच्छेदन केल्यानंतर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले.
याबाबत वनपाल भरत खुटाले यांनी सांगितले की, गव्यांच्या कळपावर वर्चस्व ठेवण्याच्या वादातून अनेक वेळा दोन प्रमुख नर गव्यामध्ये झुंज लागते. अशाच प्रकारातून ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी उसाच्या पिकात झुंज लागलेल्या ठिकाणी ऊस पूर्णपणे मोडून पडला होता.