चंदगड : चंदगड शहरात शनिवारी (दि. 9) रात्री व रविवारी (दि. 10) सकाळी शहरातील दोन पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानी एक वर्षाच्या बालिकेसह पाच जनावर हल्ला करून जखमी केले. यापैकी एका जखमी एक वर्षाच्या बालिकेवर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. चंदगड शहरात या विचित्र प्रकाराने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत नगरपंचायतने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
चंदगड येथील कॉलेज रोडवर शनिवारी रात्री ९.१५ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने आझाद गल्लीतील फारुख बेपारी (वय 18), झीशान मुल्ला (वय 13) या दोन बालकांसह तरुण रोहित धुपदाळे ( वय 30) यांच्यावर हल्ला करून तिघांच्याही उजव्या हातालाच जखमी केले. त्यांच्यावर चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
तर रविवारी (दि. 10) सकाळी आणखी एका दुसऱ्याच पिसाळलेल्या कुत्र्याने आपल्या घराच्या कट्ट्यावर बसलेल्या साजिया सलमान बेपारी (वय १, आझाद गल्ली, चंदगड) या बालिकेच्या कानाजवळ चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. तिला बेळगाव येथे उपचार घेण्याचा सल्ला चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आला.
याबाबत नागरिकांनी व लहान मुलांच्या पालकांनी सतर्क राहावे तसेच संशयास्पद कुत्रा आढळल्यास नगरपंचायतला संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी केले आहे, तर नगरपंचायत विरोधी गटनेते नावीद आत्तार यांनी जखमी बालिकेला बेळगाव येथे त्वरित उपचार घेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्याने तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे खंत व्यक्त करण्यात आली. भटक्या कुत्र्यांबाबत नगरपंचायतने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता शहरातून जोर धरू लागली आहे.