चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना तयार करत असलेला चक्रव्यूह भेदण्याचे मोठे आव्हान हसन मुश्रीफ यांना पेलावे लागणार आहे. आता हे करण्यासाठी त्यांच्या मागे प्रत्येकवेळी ठामपणे उभे असणारे अजित पवार नाहीत. त्यामुळे ही सगळी लढाई त्यांना एकट्याने लढावी लागणार आहे. भाजपने आपली आक्रमक वाटचाल सुरू केली आहे. जास्त जागा निवडून आल्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा सांगूनही अध्यक्षपद भाजपलाच हवे, ही मागणी लावून धरत आपली आक्रमकता दाखवून दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक ओळीचा हा विषय असल्याचे सांगत या आक्रमकतेला धार आणली आहे. महाडिक गट भाजपच्या माध्यमातून मुश्रीफ यांना रोखण्याचा प्रयत्न करणार, हे स्पष्ट आहे. ते परतवून लावण्याचे आव्हान मुश्रीफ यांना पेलावे लागणार आहे.
मुळात गोकुळ हातातून गेल्याची खंत महादेवराव महाडिक यांना आहे. आता त्यांचे पुतणे खासदार व मुलगा आमदार आहेत. कोल्हापूर महापालिकेत भाजपला घवघवीत यश मिळवून देत त्यांनी आपल्या समर्थकास महापौरपदी विराजमान केले आहे. आता महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे हवे आहे. त्याची चुणूक चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिली आहे; मात्र गोकुळची लढाई ही जंग आहे. ती जो जिंकणार त्याचे जिल्ह्यावर राज्य हे स्पष्ट असल्याने त्यासाठी प्रत्येकाची आक्रमक वाटचाल सुरू आहे. कारण, 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढण्यासाठी गोकुळचे लोणी हाती असणे, या रिंगणात उतरणार्यांसाठी आवश्यक आहे.
महापालिकेत राष्ट्रवादीला डावलले
महायुती म्हणून निवडणूक लढविली, तरी एक जागा जिंकलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद देऊन भाजप-शिवसेना नेत्यांनी गोकुळची जोडणी केली व विनय कोरे यांना मानाचे पान दिले; मात्र 4 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला एकही पद आजअखेर दिलेले नाही. आता स्थायी समिती शिवसेनेला मिळणार असून राष्ट्रवादी आतापर्यंत तरी पदापासून वंचित आहे. ही चक्रव्युहाची सुरुवात आहे. ‘ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर’ हे सूत्र असताना जिल्हा परिषदेत जास्त जागा मिळाल्याने राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळायला हवे; मात्र त्यावरच दावा सांगत भाजपच्या नेत्यांनी हा चक्रव्यूह मजबूत करायची तयारी सुरू केली आहे.
मुश्रीफही कच्च्या गुरूचे चेले नाहीत
असे असले तरी हसन मुश्रीफ हे कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यांनीही हे सगळे भाजपचे राजकारण उलटविण्याची पूर्ण तयारी केली असणार, हे स्पष्ट आहे; मात्र आता महाडिक भाजपात आहेत व पाठिंबा द्यायला व मुश्रीफ यांचे सगळे राजकारण पाठीवर हात ठेवून पुढे नेण्यासाठी अजित पवार नाहीत. राजकारणातले मित्र आ. सतेज पाटील बरोबर नाहीत, आ. विनय कोरे यांची भाजपशी जवळीक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये मुश्रीफ काय करणार, हे पाहावे लागेल.
जिल्हा बँकेतील अडचण गोकुळमध्ये भरून काढणार
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दहा वर्षांच्या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांना पुन्हा अध्यक्षपद भुषविता येणार नाही, हे आजतरी दिसते. यावर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रतील नेतृत्व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटणार होते; मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनाने ही भेट तूर्त लांबणीवर पडली आहे. आता याबाबत काय होणार, हे अद्याप ठरलेले नाही. जिल्हा बँक अध्यक्षपदाचा गुंता तयार झाला तर काय करायचे? यातून पर्याय म्हणून गोकुळचे अध्यक्षपद आपल्या हाती ठेवणे ही हसन मुश्रीफ यांची गरज आहे. नविद मुश्रीफ यांना एकच वर्ष अध्यक्षपद मिळाले आहे. विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्याप्रमाणे नविद मुश्रीफ यांना दुसर्यांदा अध्यक्षपदावर बसविणे, हे मुश्रीफ यांना जिल्ह्यावरील राजकीय वर्चस्वासाठी आवश्यक आहे.