सरवडे : राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर मंदिरात किरणोत्सव सोमवारी साजरा झाला. गाभार्यातील शिवलिंगावर पडलेल्या सूर्यकिरणांचा अद्भुुत क्षण अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हेमाडपंथी वास्तुकला आणि खगोलशास्त्राचा उत्कृष्ट संगम असलेले हे मंदिर अभ्यासकांचेही आकर्षण ठरत आहे.
दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावात चक्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. अभ्यासकांच्या मते, या मंदिराचे बांधकाम 14 व्या शतकापूर्वीचे आहे. दरवर्षी 1 ते 4 मे दरम्यान येथे किरणोत्सव पाहायला मिळतो. यंदा सोमवारी (4 मे) सकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी उगवत्या सूर्यकिरणांनी शिवलिंगाला स्पर्श केला आणि हा देखणा सोहळा भाविकांनी अनुभवला.
चक्रेश्वर मंदिर परिसर, तपसा व चक्रेश्वर डोंगर परिसरातील वैशिष्ट्यांमुळे येथे अश्मयुगीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील विविध टप्प्यांचा अभ्यास करता येतो. मंदिर परिसरात शिलालेख, वीरगळ, गद्धेगळ तसेच राजदंड असलेल्या दुर्मीळ मूर्ती अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतात. या परिसराचा सखोल अभ्यास उमाकांत रानिंगा आणि प्रसन्न मालेकर या संशोधकांनी केला आहे.
अंबाबाई मंदिराच्या धर्तीवर...
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवच्या धर्तीवर चक्रेश्वर मंदिरातील किरणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची मागणी भक्तांकडून होत आहे. देवस्थान समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहभागातून महाशिवरात्रीनंतर या सोहळ्याचे आयोजन करावे, तसेच मंदिराच्या स्थापत्य कलेचा अद्भुुत आविष्कार अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.