कसबा बावडा : शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या 24 जुलै रोजी राज्यभरात तीव्र ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
जोपर्यंत सरकार कर्जमाफीची निश्चित तारीख जाहीर करत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते कसबा बावडा येथील श्री मंगल कार्यालयात आयोजित ‘हुंकार मेळाव्या’त बोलत होते. बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सरकारने शेतकर्यांच्या आत्महत्या का होतात, यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली; पण आम्ही कर्जमाफीसाठी समिती मागितली होती. सरकारने वेळकाढूपणा न करता थेट कर्जमाफीची तारीख जाहीर करावी.
एकीकडे राज्याचे कृषिमंत्री रमी खेळत आहेत व दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आपल्या पिकाचा जुगार खेळत आहे. शेतकर्यांचे हे अंधारातील जगणे संपवण्यासाठीच आमची लढाई सुरू आहे. आम्हाला योग्य भाव मिळाला, तर आम्ही राज्याचे कर्ज फेडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला मतदान देणार नाही असे स्टेटस् ठेवा, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
कोल्हापूर दौर्यातील अनुभवांवर बोलताना कडू म्हणाले, ही बलिदानाची भूमी आहे; पण ती आज उपाशी आहे. येथील डोंगर खोदून उद्योगपतींची पोटे भरली जात आहेत; मात्र भूमिपुत्रांना उपाशी ठेवले जात आहे. आता या डोंगर खोदणार्यांनाच खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रास्ताविक देवदत्त माने यांनी केले. धर्मेंद्र सातव आणि आशिष शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संतोष माळी, गजानन पाटील, विश्वजित माने यांच्यासह दिव्यांग बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधान हेगडकर यांनी आभार मानले.
राज्याच्या कृषिमंत्र्यांवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, कृषिमंत्र्यांकडे इतका पैसा आहे की ते एकट्याने राज्यातील कोणत्याही एका जिल्ह्याची संपूर्ण कर्जमाफी सहज करू शकतील. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.