कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात 450 एजंटांची साखळी; दररोज 850 कोटींची उलाढाल!

Arun Patil

कोल्हापूर : सावला, मुल्ला आणि कोराणे टोळीवरील 'मोका'अंतर्गत कारवाई झाल्यानंतर शहर, जिल्ह्यातून काहीकाळ हद्दपार झालेला मटका, तीनपानी जुगारअड्ड्यांसह काळेधंदेवाल्यांचे साम्राज्य पुन्हा फैलावू लागले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशाला कोलदांडा देत काळ्या धंद्याच्या विस्तारासाठी स्थानिकस्तरावर खुलेआम मोकळीक देण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात सुमारे साडेचारशेंवर मटका एजंटांची साखळी कार्यरत झाली असून, दररोज साडे आठशे कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार होऊ लागला आहे.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पदभार स्वीकारताच मटका, तीनपानी जुगारअड्ड्यांसह काळेधंदेवाले व तस्करी टोळ्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणसह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांना दिले होते.

आदेशाचे उल्लंघन आणि कर्तव्यात कसुरी करणार्‍या घटकांवर प्रसंगी खात्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी बजावले होते. मात्र, काही काळानंतर टप्प्याटप्प्याने काळ्या धंद्यातील उलाढाली सुरू झाल्याचे चित्र आहे.

वरिष्ठांचा आदेश डावलून कलेक्शनवाल्यांचा पुढाकार!

काळेधंदेवाल्यांशी साटेलोटे असलेल्या कलेक्शनवाल्यांच्या पुढाकाराने काळेधंदेवाले व तस्करी टोळ्यांचे साम्राज्य पूर्ववत सुरू होऊ लागले आहे. कोल्हापूर शहरासह उपनगरामध्ये विशेष करून रंकाळा टॉवर, लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर, हॉकी स्टेडियम, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, सदर बाजार, कदमवाडी, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सानेगुरूजी वसाहत, राजोपाध्येनगर, फुलेवाडी, कळंबा, शिंगणापूरसह गोकुळ शिरगाव व पुलाची शिरोली परिसरात चिठ्ठी व मोबाईल मटक्याचा फंडा वाढू लागला आहे.

मटका, जुगारअड्डे अन् हातकणंगले कनेक्शन!

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हातकणंगले, शहापूर, इचलकरंजीत शिवाजीनगर, गावभाग, शिरोळ, हुपरी, जयसिंगपूर, कुरूंदवाड, वडगाव परिसरातही मटक्यासह तीनपानी जुगारी अड्ड्यांचे प्रस्थ वाढू लागले आहे. गणेशोत्सवानंतर काळ्या धंद्यातील उलाढाली वाढत असल्याचे चित्र आहे. हातकणंगलेसह परिसरात चाळीसवर एजंटांचे टोळके नव्या जोमाने कार्यरत झाले आहे. हातकणंगले ठाण्याच्या परिसरातच एजंटांचे खुलेआम कारनामे दिसून येताहेत. काळ्या धंद्यांचे वाढते साम्राज्य वरिष्ठांच्या नजरेला येत नाहीत का? हा सामान्यांचा सवाल आहे.

SCROLL FOR NEXT