चंदगड : तब्बल 25 वर्षांपासून चंदगड तालुक्यात दहा हत्तींचा कळप वेगवेगळ्या भागात कायम आहे. कळपामधील विभक्त झालेला ‘चाळोबा’ टस्कर आता तालुक्याच्या पूर्व भागात स्थिरावला आहे. तब्बल 15 दिवस टस्कराने आपला मुक्काम चिंचणे, तेऊरवाडी, अतवाड, किटवाड जंगल परिसरात ठोकला आहे. किटवाड गावात पहाटे चारच्या सुमारास चाळोबा टस्कराने गावातून फेरफटका मारला. कुत्र्यांच्या भुंकण्याने काही लोक जागे झाल्यानंतर टस्कर निवांतपणे फेरफटका मारत होता.
चंदगड तालुक्यातील सर्वच भागात त्याने आपली दहशत, दादागिरी कायम ठेवली आहे. शेती औजारे, माचणी, झोपड्या, पाईप, उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. चाळोबाची वन विभागासह चंदगड तालुक्यातील शेतकर्यांची डोकेदुखी बनली आहे. तालुक्यातील चंदगड, हेरे, तिलारी पश्चिम भागात घनदाट जंगल असल्याने हत्तींचा मुक्काम गेल्या पंचवीस वर्षांपासून कायम आहे, मात्र अलीकडेच कोवाड, किणी कर्यात भागात हत्ती आला आहे. शेती पिकांचे हत्ती दररोज नुकसान करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाला चकवा देऊन शेती पिकात उतरत आहे.
वन विभागाला चकवा देत कामेवाडी, चिंचणे येथील अजित पाटील यांच्या व ऊस पिकाचे व अशोक पाटील यांच्या रोप वाटिकेचे नुकसान केले. वन विभागाने हत्तीला रोज रात्री उशिरापर्यंत जंगल क्षेत्रातच ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. हत्तीच्या भीतीने शेतातून काम करणारे शेतकरी भयभीत झाले आहेत.
फक्त चंदगडच्या पश्चिम भागात राहणारे हत्ती आता किणी - कर्यात भागात स्थिरावत आहेत. मुबलक चारा आणि पाणी मिळत असल्याने हत्तींचा मुक्काम आता वाढत चालला आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.