कोल्हापूर

कोल्हापूर : सिझेरियनचे प्रमाण 30 टक्क्यांवर

Arun Patil

कोल्हापूर, डॅनियल काळे : सामान्य बाळंतपणाचे प्रमाण हळूहळू घटत असून सिझेरियनचे प्रमाण वाढत चालले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण बाळंतपणापैकी 30 टक्के सिझेरियनच झाले आहे; तर उर्वरित बाळंतपणे सामान्य झाली आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांमध्ये अद्यापही सिझेरियनचे प्रमाण कमी म्हणजे 12 ते 13 टक्के इतके आहे. शहरी भागात किंवा नगरपालिका विभागात राहणार्‍या महिलांमध्ये सिझेरियनचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.

आई होणे हा प्रत्येक महिलेच्या जीवनात आनंदाचा क्षण असतो. पण बाळंतपण म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्मच असतो. महिलांना प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांनाच काळजी लागून राहिलेली असते. अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. त्यामुळे अवघड समजल्या जाणार्‍या शस्त्रक्रिया आता सोप्या होऊ लागल्या आहेत. आई होतानाच्या प्रसव वेदना सहन करणे हे आता अनेकजणींना नकोसे वाटत आहे. त्यामुळे सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणून सिझेरियनकडे पाहिले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे आजदेखील सरकारी रुग्णालयातून सामान्य बाळंतपणे होण्याचे प्रमाण खूपच चांगले आहे. अगदी गरज असेल, गुंतागुंत असेल तरच सरकारी रुग्णालयात सिझेरियन केले जाते. याउलट खासगी रुग्णालयात मात्र सिझेरियनचे प्रमाण अधिक दिसून येते. याला वेगवेगळी कारणे असून शकतात. कोल्हापूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत एकूण 66 हजार 270 बाळंतपणे झाली. यामध्ये 20 हजार 883 बाळंतपणे सिझेरियनद्वारे करण्यात आली; तर उर्वरित 46 हजार 387 बाळंतपणे नॉर्मल झाली आहेत. कोल्हापूर शहर विभागात एकूण 30 हजार 175 बाळंतपणे झाली. यामध्ये 11 हजार 199 महिलांचे सिझेरियनच झाले आहे.

ग्रामीण भागामध्ये एकूण 21 हजार 266 बाळंतपणे झाली. यामध्ये 3561 महिलांचे सिझेरियन झाले तर उर्वरित 17 हजारांवर महिलांची बाळंतपणे सामान्य झाली. यावरून ग्रामीण भागात महिलांमध्ये सिझेरियनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT