Census Preparations | जनगणना तयारी सुरू Pudhari File Photo
कोल्हापूर

Census Preparations | जनगणना तयारी सुरू

पूर्वतयारीची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात रखडलेल्या 16 व्या जनगणनेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या जनगणनेसाठी पूर्वतयारीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला राज्याचे जनगणना महासंचालक यांनी दिले आहेत. सुमारे वर्षभर ही प्रक्रिया सुरू राहणार असून प्रत्यक्ष जनगणना मार्च 2027 मध्ये होणार आहे.

देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते. देशाची 16 वी जनगणना मार्च 2021 अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तत्पूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती.यामुळे जगनणना सुमारे चार वर्षे रखडली होती आता केंद्र शासनाने जनगणनेबाबतची घोषणा केली आहे. त्यानुसार दोन टप्प्यांत ही जनगणना होणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर 2026 मध्ये आणि दुसरा टप्पा 1 मार्च 2027 मध्ये सुरू होणार आहे. जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात जनगणना होणार आहे.

सीमा गोठवण्याचे आदेश

या जनगणनेसाठी सुमारे वर्ष ते दीड वर्ष आवश्यक तयारी करावी लागत असल्याने त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या जनगणनेसाठी सीमा गोठवण्याची (जनगणना करण्यासाठी क्षेत्र निश्चित करणे; एकदा क्षेत्र निश्चित झाले की त्यात जनगणना होईपर्यंत बदल होणार नाही) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत जनगणनेसाठी सीमा गोठवल्या जाणार आहेत.

प्रगणक, पर्यवेक्षक, प्रशिक्षकांसाठी डेटा बेस तयार करा

जनगणनेसाठी आवश्यक प्रगणक, पर्यवेक्षक आणि प्रशिक्षक यानुसार जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्‍यांचा डेटा बेस तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष जनगणनेसाठी लागणार्‍या प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष जनगणना करणे ही कामे येत्या दीड वर्षात केली जाणार आहे. जनगणनेच्या विविध प्रशिक्षणांसाठी जागाही निश्चित करण्याचीही सूचना या पत्राद्वारे देण्यात आली आहे.

घर याद्या, वॉर्ड याद्या तयार करा

या जनगणनेसाठी घर याद्या, वॉर्ड याद्या तयार कराव्या लागतात. त्यांचे काम काही महिने सुरू राहते. या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश महासंचालकांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

प्रथमच होणार डिजिटल आणि जातीनिहाय जनगणना

16 वी जनगणना प्रथमच डिजिटल स्वरूपात होणार आहे. तसेच यामध्ये जातीनिहाय गणना होणार आहे. मोबाईल अ‍ॅप तसेच पत्रकांवर माहिती भरणे, अशा दोन पद्धतीने जनगणना होणार आहे. पहिल्या टप्प्यात वॉर्ड, विभाग, गाव, शहरनिहाय याद्या तयार करणे आणि त्यानुसार गणना करण्यात येईल. दुसर्‍या टप्प्यात प्रत्यक्ष माहिती मोबाईल अ‍ॅप व पत्रकांत भरली जाणार आहे. घरयादी व घरगणना करण्यासाठी प्रगणक, पर्यवेक्षकांसाठी सोपे, सोयीस्कर व अनुकूल मोबाईल अ‍ॅप बनविलेले आहे. अँड्रॉईड 4.0 आणि त्यावरील व्हर्जनच्या मोबाईलवर हे अ‍ॅप काम करणार आहे. यामुळे प्रगणकास जनगणना करताना यापूर्वीसारख्या जड पुस्तकांसोबत फिरण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या 43 लाखांवर, राज्याची साडेबारा कोटींवर जाण्याची शक्यता जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेनुसार 38 लाख 76 हजार इतकी तर राज्याची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी होती. या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या 43 लाखांवर तर 12 कोटी 50 लाखांच्या पुढे जाईल, अशी शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT