कोल्हापूर : बिहार विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल छत्रपती शिवाजी चौकासह शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल- ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी ढोल-ताशावर ठेका धरला.
बिहारमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेला जनतेने दिलेला कौल आहे. मत चोरीचा खोटा निगेटिव्ह पसरवणारे या निकालामुळे उघडे पडले आहेत. समाजातील सर्वात वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे पक्षाचे ध्येय सातत्याने यशस्वी होत असल्याचे या निकालावरून दिसून येते असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विकासाचे पर्व वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निकालातून सर्व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन जोमाने कामाला लागावे, असे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, विराज चिखलीकर, अमर साठे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, राजसिंह शेळके, माधुरी नकाते, सुभाष रामुगडे, किरण नकाते यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेरा नगराध्यक्ष महायुतीचे निवडून येतील : महाडिक
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील, असे म्हटले होते आणि तसेच घडले. नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये देखील सर्व तेरा नगराध्यक्ष महायुतीचे निवडून येतील, असेही खा. महाडिक म्हणाले.