कोल्हापूर : दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त कस्तुरी क्लब आणि माधव मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरी स्नेहसंमेलन जल्लोषात आणि कस्तुरी सदस्यांच्या अपूर्व उत्साहात पार पडले. बॉलीवूडच्या सदाबहार गाण्यांवरील नृत्याविष्कार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाने रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यात ग्रुप लीडर गटातून सविता पाटील यांनी, तर सभासद गटातून अनिता उमेश पाटील यांनी मिसेस कस्तुरी या प्रतिष्ठेच्या किताबावर आपले नाव कोरले. कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची रेट्रो थीम हे प्रमुख आकर्षण ठरली. चुडी मजा न देगी, कंगन मजा न देगा आणि तुमसे मिली नजर यांसारख्या गाण्यांवर कस्तुरी सदस्यांनी धरलेल्या ठेक्याने मैफिलीत उत्तरोत्तर रंग भरला. यावेळी डॉ. आशुतोष देशपांडे यांनी खरं सौंदर्य म्हणजे काय? या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. चेहर्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हेच खरं सौंदर्य या एका उत्तराला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. डॉ. देशपांडे यांनी उत्तम आरोग्य आणि सौंदर्य यांचा आधार पुरेशी झोप व योग्य आहार असल्याचे सांगितले. डॉ. देशपांडे यांनी महिलांना विविध सौंदर्यविषयक टिप्स दिल्या. घरच्या जबाबदार्या पार पाडताना महिलांचे स्वतःकडे दुर्लक्ष होत असते. आरोग्य आणि सौंदर्य टिकवण्यासाठी किमान 7 तास झोप घेणे आवश्यक असते. शिवाय आहार हा देखील व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक?आहे, असे ते म्हणाले.
याच कार्यक्रमात कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. डॉ. स्मितादेवी जाधव आणि माधव मिशनचे डॉ. आशुतोष देशपांडे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. रक्षा राठी, डॉ. पूजा गुर्जर, डॉ. जुई हाडकर आणि डॉ. युगंधरा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. ब्युटी अॅन्ड ब्रायडलच्या अमरजा नाजरे, कला तपस्वी डान्स स्टुडिओच्या राजनंदिनी पत्की, शुभांगी साडीच्या शुभांगी थोरात आणि माय फर्स्ट लेडी बुटीकच्या लक्ष्मी भोसले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सदस्यांचा उत्साह आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा स्नेहसोहळा अविस्मरणीय ठरला. डॉ. देशपांडे यांच्या वतीने सर्वांना अल्पोपाहार देण्यात आला.
कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी जाधव म्हणाल्या, कस्तुरी आयोजित स्पर्धांमध्ये वयस्क महिलांना देखील सहभागी होऊन आनंद साजरा करताना पाहणे ही समाधानाची बाब आहे. महिलांना असेच नेहमी आनंदी पाहण्यासाठी कस्तुरी क्लब कार्यरत आहे. यापुढे देखील सातत्याने महिला हिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व कस्तुरींना शुभेच्छा देताना कस्तुरीच्या सदस्यांसोबत त्यांनी केक कापून आनंद साजरा केला. अनेक महिलांनी त्यांच्या सोबत सेल्फीसाठी गर्दी केली. त्यावेळी त्यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली.
मिसेस कस्तुरी (ग्रुप लीडर)
प्रथम क्रमांक : सविता पाटील
द्वितीय क्रमांक : माधवी वाघ
तृतीय क्रमांक : मयुरी कदम
ग्रुप डान्स
प्रथम क्रमांक : स्मिता पाटील ग्रुप
द्वितीय क्रमांक : मेघा सावंत ग्रुप
तृतीय क्रमांक : स्पार्कल ग्रुप
मिसेस कस्तुरी (सभासद)
प्रथम क्रमांक : अनिता पाटील
द्वितीय क्रमांक : वंशिका निगडे
तृतीय क्रमांक : प्रफुल्लता बिडकर
सोलो डान्स
प्रथम क्रमांक : रेश्मा कोळी
द्वितीय क्रमांक : श्रावणी बाबर
तृतीय क्रमांक : ऋतुजा मसवेकर
विशेष पुरस्कार
लकी ड्रॉ विजेत्या : रूपाली लोळगे (म्युझिक सिस्टम)
बेस्ट स्माईल : स्नेहल संग्राम
बेस्ट हेअरस्टाईल : ज्योती झेंडे
बेस्ट बॉलीवूड ड्रेपरी : स्मिता पाटील