Fake Medicines CDSCO Action | बनावट, निकृष्ट औषधांवर ‘सीडीएससीओ’चा बडगा! 
कोल्हापूर

Fake Medicines CDSCO Action | बनावट, निकृष्ट औषधांवर ‘सीडीएससीओ’चा बडगा!

एप्रिलमध्ये 169 औषधे दर्जाहीन; यकृत, पित्ताशयावरील औषधाची एक बनावट बॅच जप्त

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : देशातील औषधांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था केंद्रीय औषधे गुणवत्ता नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) एप्रिल 2026 मधील नियमित तपासणीत एका औषधाच्या बॅचला बनावट (स्प्युरियस) ठरविताना तब्बल 169 औषधे आणि औषधी संयुगे निकृष्ट दर्जाची (नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी- एनएसक्यू) असल्याचे जाहीर केले आहे.

सीडीएससीओच्या अहवालानुसार, पित्ताशयातील खडे विरघळविण्यासह यकृताच्या विकारांवर वापरल्या जाणार्‍या ‘युर्सोडिऑक्सिकोलिक अ‍ॅसिड’ गोळ्यांची एक बॅच बनावट आढळली. ही बॅच बिहारमध्ये सापडल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी संबंधित ब्रँडचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, औषधाच्या लेबलवर नमूद असलेल्या मूळ उत्पादक कंपनीने संबंधित बॅच आपण तयार केलेली नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्याने हे औषध बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

‘सीडीएससीओ’ने 169 औषधांचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचेही स्पष्ट केले आहे. यापैकी 42 नमुन्यांची तपासणी केंद्रीय प्रयोगशाळांमध्ये, तर 129 नमुन्यांची तपासणी राज्य प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली. निकृष्ट दर्जाच्या औषधांमध्ये सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पॅरासिटामॉल, पॅन्टोप्राझोल आणि मल्टिव्हिटॅमिनपूरक औषधे यांचाही समावेश आहे. याशिवाय उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणार्‍या टेल्मिसार्टन गोळ्यांच्या अनेक बॅच, वेदनाशामक डायक्लोफेनॅक औषधे तसेच अ‍ॅलर्जीवरील लेव्होसेट्रीझीन आणि मॉन्टेल्युकास्ट संयुगांच्या गोळ्याही दर्जाहीन आढळल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र या घडामोडींमुळे सर्व औषधांबाबत भीती निर्माण करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कायद्यानुसार कारवाईची ग्वाही

अधिकृत परवानगी नसलेले उत्पादक इतर नामांकित कंपन्यांच्या ब्रँड नावांचा वापर करून औषधे तयार करतात, तेव्हा त्या औषधांना ‘स्प्युरियस ड्रग्ज’ मानले जाते. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, औषधे आणि प्रसाधने कायद्यानुसार संबंधितांविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT