कोल्हापूर

बेकायदेशीर घोडा गाडी शर्यंत प्रकरणी सरपंच उपसरपंचासह घोडे चालक-मालकांवर गुन्हा दाखल

Shambhuraj Pachindre

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे श्री काशिलिंग बिरदेव यात्रा व पीर अहमदसो , पीर बालेचाँदसाब ऊरुस निमित्य विनापरवानगी घोडागाडी शर्यत घेतल्याने शिरोलीच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी यांच्यासह २३ जणांवर शर्यतीचे आयोजक म्हणून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि.१३) सकाळी ८ वाजता शिरोली एमआयडीसीमधील शिवसूत्र तरुण मंडळ ते विटभट्टी माळभाग या परिसरात यात्रा व ऊरुस निमित्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैलगाडी शर्यतीचे रितसर परवानगी पोलिसातून देण्यात आली होती. पण, बैलगाडी शर्यत संपल्यानंतर आयोजकांनी विनापरवानगी घोडागाडी शर्यतीचे आयोजन करुन घोडागाडी शर्यत स्पर्धा घेतली.

त्यावेळी एमआयडीसी परिसरात डांबरी रस्त्यावरून घोडागाडी धावत असताना डांबरी रस्त्यावरून घोड्यांचे पाय घसरुन पडल्याने चार घोड्यासह दोघेजण जखमी झाले . घोडागाडी रस्त्यावरून पाय घसरुन पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी आयोजक सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे, उपसरपंच अविनाश अनिल कोळी, सदस्य बाजीराव शामराव पाटील, महादेव रघुनाथ सुतार, श्रीकांत बापू कांबळे, महंम्मद युसुफ महात, सौ.कोमल सचिन समुद्रे, हर्षदा दीपक यादव, सौ.अनिता विठ्ठल शिंदे, सौ. धनश्री योगेश खवरे, शाहरुख मौला जमादार, अरमान राजू सर्जेखान, सौ.सुजाता बाळासो पाटील, विजय बंडा जाधव, सौ.मनिषा संपत संकपाळ, सौ. कमल प्रकाश कौंदाडे, कु.वसिफा हिदायततुल्ला पटेल, आरिफ महंमद सर्जेखान, सौ.नजिया मोहिद्दीन देसाई, शक्ती दिलीप यादव, यांच्या सह घोडागाडी चालक मालक शाहरूख मौला जमादार, समीर नसीर सनदे, रियाज राजू नगारजी (सर्व रा. शिरोली पुलाची ता. हातकणंगले) यांच्यावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील घोडागाडी चालक-मालक यांनी बेकायदेशीर शर्यतीमध्ये सहभाग घेतला.तसेच शर्यतीमध्ये घोड्यांना अमानुषपणे मारहाण केली. निर्दयपणे घोड्यावर अत्याचार केला. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर घोडे पळत असताना पाय घसरून पडल्याने चार घोडे जखमी झाले. यामध्ये एक दुचाकी स्वारही जखमी झाला. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT