₹2.5 Crore Embezzlement | अडीच कोटींच्या अपहारप्रकरणी दोन फर्मसह दोघांवर गुन्हा दाखल Pudhari Photo
कोल्हापूर

₹2.5 Crore Embezzlement | अडीच कोटींच्या अपहारप्रकरणी दोन फर्मसह दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले : भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित माणगाव (ता. हातकणंगले) या संस्थेच्या नावे मशिनरी खरेदी करण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत २ कोटी ५६ लाख ५० हजार रुपयांची कर्जाची रक्कम मशिनरी खरेदी न करताच परस्पर लाटल्याने दोन फर्मसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे लेखापरीक्षक फिरोज दस्तगीर मुजावर (रा. रुकडी) यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे. महादेव सखाराम आरे (वय ५५, रा. माणगाव), आनंदा ईश्वरा आसबे (वय ५३, रा. इचलकरंजी), मशिनरी पुरवठादार दूधगंगा वेदगंगा एंटरप्रायजेस इचलकरंजी व ओम इलेक्ट्रिकल्स अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

महादेव आरे व आनंदा आसबे यांनी संगनमत करून भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेला लागणारी औद्योगिक मशिनरी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून २,५६,५०,००० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. ही रक्कम देना बँकेच्या इचलकरंजी शाखेतील संस्थेच्या नावे असलेल्या खात्यामध्ये जमा झाली.

यानंतर दोघांनी मशिनरी पुरवठादार दूधगंगा वेदगंगा एंटरप्रायजेस इचलकरंजी यांच्याकडून मशिनरी खरेदी न करता या एंटरप्रायजेस तसेच ओम इलेक्ट्रिकल इचलकरंजी यांच्या नावे धनादेश देऊन या कर्जाच्या एकूण २,५६,५०,००० रुपयांचा परस्पर अपहार केला. ही घटना २०१२ ते २०२३ अखेर या कालावधीत घडली असून लेखापरीक्षण दरम्यान हा अपहार झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर 31 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास शासनाकडून परवानगी मिळण्यास वेळ झाल्याने गुन्हे दाखल करण्यास विलंब झाल्याचे लेखापरीक्षकांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT