उजळाईवाडी : उजळाईवाडी नजीक कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने गोरक्षनाथ प्रकाश पाटील (वय 30, रा. गिरगाव, ता. करवीर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अभिजित दिनकर खोत (वय 34, रा. कासारवाडा, ता. राधानगरी) जखमी झाले. हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला.
गोरक्षनाथ व अभिजित मुडशिंगी येथील खासगी कंपनीत नोकरीस होते. शनिवारी दुपारी चार ते रात्री साडेबाराची ड्युटी संपवून ते दुचाकीने गिरगावकडे निघाले होते. उजळाईवाडी विमानतळ बोगद्यातून शाहू नाक्याकडे येत असताना कार (एमएच-12 ईटी-2231) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात गोरक्षनाथ गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. जखमी अभिजितला सीपीआर रुग्णालयात व त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. कारमालक रमेश विनायक पोवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अभिजित खोत यांनी फिर्याद दिली आहे. गोरक्षनाथ पाटील यांच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याच्या मागे आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.