कोल्हापूर : कसबा बावडा - कदमवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वावर असणाऱ्या कोल्ह्याला वन विभाग व महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शुक्रवारी सायंकाळी पकडले. मात्र उपाशी असणाऱ्या कोल्ह्याची धावपळ झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
जंगल परिसरातून अन्नाच्या शोधात ऊस क्षेत्रात आलेला कोल्हा वाट चुकून शहरात आला. कसबा बावडा परिसरातून पितळी गणपतीमार्गे कोल्हा शुक्रवारी कदमवाडी परिसरात पोहोचला होता. सकाळपासून ठिकठिकाणी हा कोल्हा अनेकांना दिसला होता. अनेकांकडून त्याला दगड मारून पळवून लावल्याचा प्रकार झाला होता. याबाबतची माहिती वन विभाग आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी दोन्ही विभागांचे अधिकारी व कर्मचारी कदमवाडीत दाखल होते. मनपा अग्निशमन विभागाचे चिफ फायर ऑफिसर मनीष रणभिसे, कसबा बावडा स्टेशन ऑफिसर विजय सुतार, फायरमन सुनील यादव व आशिष माळी, चालक सुशांत पवार यांच्यासह वन विभागाच्या वन्य जीव पथकातील वन रक्षक ओंकार भोसले, ऋषीकेश येडगे, ओमकार काटकर, आशुतोष सूर्यवंशी, तौसिफ शेख यांनी सापळा रचून कोल्ह्याला पकडले.
दरम्यान, पकडलेला कोल्हा अग्निशमन विभागाने वन विभागाकडे सुपूर्द केला. त्याला सुरक्षित ठिकाणी नेताना प्रचंड दमलेल्या अवस्थेत वाटेत त्याचा मृत्यू झाला. त्याची वैद्यकीय तपासणीचे काम वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उपाशी असल्याने आणि प्रचंड धावपळीमुळे कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देत मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी दिली.