डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली, तरी अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतर्गत शह-कटशहाचे राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये काही प्रभागांत उमेदवारीचा गुंता निर्माण झाला असून निष्ठावंत विरुद्ध आयात उमेदवार असा संघर्ष उभा राहिला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या अनेक इच्छुकांना आता त्याचा फटका बसताना दिसत आहे. एका पक्षात प्रवेश केला, तर संबंधित प्रभागाची जागाच मित्र पक्षाला गेल्याने अनेक माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची कोंडी झाली आहे. जागा मर्यादित आणि इच्छुकांची संख्या अधिक या समीकरणामुळे पक्षनेतृत्वासमोर निर्णय घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
महायुतीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांत अलीकडच्या काळात अनेक माजी नगरसेवक व मातब्बर नेत्यांनी प्रवेश केला. मात्र, जागावाटपात काही प्रभाग मित्र पक्षांना सोडावे लागल्याने उमेदवारी देण्याच्या अटीवर पक्षात आलेल्यांची अडचण वाढली आहे.
ज्या प्रभागांत मूळ पक्षाचे उमेदवार आधीच कामाला लागले आहेत, तेथे नव्याने आलेल्यांना उमेदवारी कशी द्यायची, हा प्रश्न नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे.
बाजारगेट परिसरात एका माजी पदाधिकार्याच्या मुलाला उमेदवारी मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असले, तरी अनेक स्थानिक नेते त्याला विरोध करत आहेत. आधीच काही स्वयंघोषित उमेदवार प्रचारात उतरले असून, त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष उफाळून येऊ लागला आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. येथेही उमेदवारीवरून तीव्र संघर्ष सुरू आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांच्या कुटुंबातील एका माजी पदाधिकार्यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, तेथे उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने ते पुन्हा महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एकूणच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला, तरी उमेदवारीच्या डावपेचातच अनेक इच्छुकांची धोबीपछाड होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. प्रत्येक प्रभागात राजकीय डावपेच सुरू असून, उमेदवारीचा हा गुंता नेमका कधी सुटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजारामपुरी परिसरातील एका प्रभागात माजी स्थायी सभापतीची उमेदवारी अडचणीत आली आहे. कदमवाडी परिसरात निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, यावर एका पक्षाचा नेता ठाम असून, दुसरीकडे नुकताच पक्षात प्रवेश केलेला मातब्बर नेता आपल्या नातेवाईकासाठी आग्रही असल्याने तिथे गुंता निर्माण झाला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल; पण अधिकृत उमेदवार जाहीर नाहीत
पक्षांतर केलेल्यांना जागावाटपाचा फटका
महायुतीत जागा कमी, इच्छुक अधिक
अनेक प्रभागांत स्वयंघोषित उमेदवारांमुळे अंतर्गत रणकंदन
महाविकास आघाडीतही शह-काटशहाचे राजकारण तीव्र