Bus Fire | छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीला निघालेल्‍या बसला आग; प्रवासी सुखरूप 
कोल्हापूर

Bus Fire | छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीला निघालेल्‍या बसला आग; प्रवासी सुखरूप

सतर्कतेने वाचले प्रवाशांचे जीव

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर/इचलकरंजी : छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीला निघालेली बस शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पांढरी पिंपळगावजवळ अचानक पेटली. ही बाब बसच्या मागे असलेल्या कारचालक प्राचार्य अमोल नागवडे यांच्‍या लक्षात आली. त्यांनी अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पांढरी पिंपळगावजवळ बससमोर कार आडवी लावत बसमधून धूर येत असल्‍याचे सांगितले.

बसला आग लागल्‍याचे समजताच वाहक सुनील दिनकर कांबळे (रा. इचलकरंजी) व चालक ओंकार लक्ष्मण कुंभार यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने ३८ हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले. या थरारक प्रसंगानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. चालक, वाहक यांच्यामुळेच आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

...अन् काळजाचा ठोका चुकला

इचलकरंजीचे आगार व्यवस्थापक नरेंद्र बोदे यांच्यासह अधिकार्‍यांनी तातडीने संभाजीनगर आगार तसेच चालक, वाहक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. इचलकरंजीतील प्रवासी बसमध्ये होते का, याची खात्री केली. सोशल मीडियावरही इचलकरंजी आगाराच्या बस दुर्घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे काही वेळ शहरवासीयांच्या काळजाचाही ठोका चुकला होता.

दागिने, पैसे जळाले

आग इतकी भयंकर होती की, या आगीत प्रवाशांच्या बॅगमध्ये असलेले दागिने काहींचे पैसे असे सुमारे तीन लाखांच्या आसपासचा मुद्देमाल जळून खाक झाला. या बसमध्‍ये बहुतांश वारकरी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT