कोल्हापूर : टाकाळा परिसरात सरनाईक कॉलनी येथील श्रीमती शारदा गणपतराव चव्हाण यांच्या मालकीचा बंगला फोडून दोन एलईडी टीव्हींसह देवघरातील चांदीच्या मूर्तीसह किमती साहित्य लंपास करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. संशयितांकडून 3 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आदित्य भीमराव दिंडे (वय 23, रा. नवशा मारुती मंदिर, राजारामपुरी), वैभव दिलीप कांबळे (19, माधवनगर, कणेरीवाडी, ता. करवीर), सुमित अमर जाधव (21, कणेरीवाडी, करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी दिंडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. संशयितांकडून शहरासह ग्रामीण भागातील घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रकरणी समरजितसिंह पाटील (रा. 11 वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. श्रीमती चव्हाण यांच्या मालकीचा प्रिया बंगला चोरट्यांनी फोडून घरातील चांदीचे क्वॉईन, चांदीच्या चार मूर्ती तसेच दोन टीव्ही संच व रोख रक्कम, तांब्यांची भांडी असा मुद्देमाल लंपास केला होता. दि. 6 ते 9 सप्टेंबर या काळात हा प्रकार घडला होता. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील यांनी टोळीचा छडा लावून त्यांना कणेरीवाडी कमानजवळ जेरबंद करण्यात आले. संशयितांकडून 3 लाख 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. टोळीला राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. अन्य दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे कळमकर यांनी सांगितले.