Kolhapur Theft News
बांबवडे : बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील गणेश नगर मधील संतोष नारायण येळूकर यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १० तोळे सोने व ५० हजारांची रोखड लंपास केली. दरम्यान याचवेळी बंद असलेले गणेश आनंदा पावसकर, महादेव मंदिर परिसरातील गायकवाड सरकार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला होता. पण पावस्कर व गायकवाड यांच्या घरी चोरट्याला काही सापडले नाही.
या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत आधिक माहिती अशी की, बांबवडे येथील संतोष नारायण येळूकर मिस्त्री काम करतात. ते आपल्या निपाणी या मूळ गावी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील कपाट उचकटून दहा तोळे सोने व 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
येळूकर यांच्यानंतर चोरट्यांनी, गणेश आनंदा पावसकर व महादेव मंदिर परिसरातील गायकवाड सरकार यांचे बंद घराचे कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला. परंतु चोरट्याच्या हाती काही लागले नाही. दरम्यान, सकाळी या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल विनोद जाधव व सत्यजित ढाले यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. चोरट्याचा शोध घेण्यासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू ठोस काही सापडले नाही.
दरम्यान, शाहूवाडी पोलिसांनी कोल्हापूर येथून श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारन केले आहे. या घटनेचा आधिक तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.