कोल्हापूर : सांगली येथील सराईत गुन्हेगारांनी अलिशान चारचाकीतून कोल्हापूरात येवून अवघ्या तासाभरात घरफोडी केल्याचे उघड झाले. राजेंद्रनगर येथील घरफोडीचा छडा लावला असून, सांगलीतील सराईत गुन्हेगार लोकेश सुतार, संदीप पाटील यांचा शोध सुरु असून, सोने विक्रीसाठी आलेल्या गणेश अरुण चव्हाण (वय ३१ रा. लक्ष्मीनगर, ता. मिरज जि. सांगली) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १० तोळे सोन्याची लगड, एक मोबाईल, लोखंडी पकड, दुचाकी जप्त केली.
फिर्यादी श्वेता वैभव देवकर (वय ३५ रा. साची रेसिडेन्सी, राजेंद्रनगर) २४ जून रोजी सायंकाळी भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. रात्री ८ वाजता घरी परतल्यानंतर, त्यांना कपाटातील १४ तोळे दागिन्यांसह रोख १८ हजार लंपास झाल्याचे दिसून आले. राजारामपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण याचा संयुक्त तपास करत असताना, सराईत घरफोड्या लोकेश सुतार व संदीप पाटील यांनी घरफोडी करुन, सोने विक्रीची जबाबदारी गणेशकडे दिली. बुधवारी रात्री गणेश सोने विक्रीसाठी आला असता, त्याला सापळा रचून अटक केली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, विकास जाधव यांच्या मार्गशर्दनाखाली पोलीस अंमलदार वैभव पाटील, संदीप सावंत, संतोष बरगे, सत्यजित तानुगडे, विशाल शिरगांवकर, सागर चौगुले यांनी ही कारवाई केली.
अलिशान मोटारीतून आले...
सायंकाळी ७ वाजता दोघे संशयीत मोटारीतून आल्याचे सिसीटीव्हीतून समोर आले. लोकेश आणी संदीप सांगली येथून मोटारीतून आले होते. लोकेशवर राज्यभरात ५० तर संदीपवर १० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
दोन महिन्यात ४ तोळे अन् १८ हजार गायब
या चोरीत १४ तोळे दागिने, १८ हजार रोख लंपास केले होते. मात्र गणेशच्या ताब्यातून १० तोळेच दागिने हस्तगत केले. चोरट्यांनी दोन महिन्यात तब्बल ४ तोळे दागिने आणी १८ हजार उधळले.
जनावरांचा डॉक्टर ते चोरीचे दागिने विक्री
गणेश चव्हाण हा जनावरांचा डॉक्टर असल्याचे सांगत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने या परिसरात जनावरे तपासण्यासाठी आल्याचे सांगितले.