कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत येथील शिवाजी पाटील यांचा बंद बंगला फोडून कपाटातील दोन लाखांची रोकड, सहा तोळे दागिने व मौल्यवान साहित्य असा सुमारे ८ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी बंगल्यातील फर्निचर, बेडरूमसह अन्य खोल्यांतील साहित्याला आग लागली. त्यात मौल्यवान साहित्यासह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. मनपा अग्निशमन दलाच्या पथकाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
काटे मळ्यात ईरा गार्डन संकुलातील ‘शिवशैल’ बंगल्यात शिवाजी पाटील व त्यांच्या पत्नी सीमा पाटील राहतात. त्यांचा मुलगा आणि मुलीचे पुण्यात वास्तव्य असते. पाटील दाम्पत्य शुक्रवारी (दि. ५) पन्हाळा तालुक्यातील आरळे येथील शेतातील घराकडे गेले होते. चोरट्यांनी तळमजल्यावरील देवघराजवळचे लाकडी कपाट कटावणीने उचकटून त्यातील दागिने व रोकड लंपास केली.