गडहिंग्लज ः वेगवेगळ्या बँकांची थकीत कर्जे, खासगी सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे, या सगळ्याची परतफेड करण्यासाठी 35 कोटींचा विमा मिळविण्याच्या हेतूने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत एका कामगाराचा खून करणार्या बिल्डरला जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावास, अशी शिक्षा गडहिंग्लजचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी सुनावली.
अमोल जयवंत पोवार (वय 31, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) या बांधकाम व्यावसायिकाने रमेश कृष्णा नायक (19, रा. विजापूर, त्यावेळी रा. कडगाव) या कामगाराचा खून करून मृतदेह आपल्या मोटारीत ठेवून आजरा तालुक्यातील वेळवट्टी येथे मोटार पेटवून देत स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. याप्रकरणी एस. ए. तेली यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. याप्रकरणी एकूण 71 साक्षीदार तपासण्यात आले. यातील 30 साक्षीदार फितूर झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, अमोल जयवंत पोवार याची कृपासिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही फर्म होती. कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने यातून बाहेर पडण्यासाठी अमोल हा सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत होता. यातूनच विम्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. यासाठी त्याने 35 कोटींचा विमा काढून त्याचा 4 लाख 96 हजारांचा हप्ता भरला होता. 26 फेब—ुवारीपासून ही पॉलिसी सुरू झाली होती. 28 फेब—ुवारी 2016 रोजी वेळवट्टी हद्दीजवळ एक मोटार ओढ्यामध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आली. यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जळून त्याची केवळ कवटी शिल्लक राहिल्याचे दिसत होते. ही मोटार अमोल पोवार याच्या मालकीची असल्याने मृतदेह त्याचा असल्याचा संशय होता. मात्र, कुटुंबीयांनी मृतदेहाजवळ सापडलेले साहित्य त्याचे नसल्याचे सांगितले. मात्र, या घटनेपासून तो बेपत्ता असल्याने पोलिसांना संशय आला होता.
अखेर पोलिसांनी माग काढत त्याला केरळमधून अटक केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. स्वतःवर असलेले कोट्यवधीचे कर्ज?भागवण्यासाठी मृत्यूचा बनाव केला तर विम्याचे पैसे मिळतील, असे गृहीत धरून अमोलने आजरा तालुक्यातील आर्दाळजवळून मध्यरात्रीच्या सुमारास रमेश नायक या रस्त्यावरून निघालेल्या एका कामगाराला आपल्यासोबत घेतले. त्याला नोकरीचे आमिष दाखवून एक हजार रुपये दिले व दारूही पाजली. दारूची नशा चढल्यावर अमोलने नायक याचा गळा दाबून मोटारीतच खून केला. स्वतःच्या अंगावरील कपडे त्याच्या अंगावर चढवले. नंतर ओढ्याजवळ मृतदेहासह मोटार पेटवून दिली व तेथून पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करीत अमोलला बेड्या ठोकल्या. यामध्ये अमोलचा भाऊ विनायक जयंत पवार (35) यालाही अटक केली होती. मात्र, सबळ पुराव्यांअभावी त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले.