कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणास 1 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सुवर्णमहोत्सवी पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. Pudhari File Photo
कोल्हापूर

इतिहासाची सदैव साक्ष देणारा शिवाजी विद्यापीठातील छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

उद्या सुवर्ण महोत्सव; शिल्पकार बी. आर. खेडकर यांची अजरामर कलाकृती

पुढारी वृत्तसेवा
प्रवीण मस्के

कोल्हापूर : शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ।... या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य कार्याची महती सांगणार्‍या पंक्तींप्रमाणेच गेल्या 50 वर्षांपासून शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ ब्राँझ पुतळा ऊन, वारा, पावसात स्थितप्रज्ञपणे इतिहासाची साक्ष देत आहे.

विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर दिमाखात उभे असलेल्या या पुतळ्यास 1 डिसेंबर 2024 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण झालेले व 500 हून जास्त पुतळे उभारणारे पुण्यातील शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी हा पुतळा साकारला. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या इच्छेनुसार 1970 ला शिवरायांचा भव्य पुतळा साडेअठरा फूट उंचीचा करून पाहिजे, अशी दैनिकात जाहिरात दिली. त्याचे मॉडेल व कोटेशन मागवले.

खेडकर यांचेच मॉडेल समितीला पसंत पडले. खेडकर यांनी विद्यापीठाच्या प्रांगणात लावलेले साडेअठरा फूट उंचीचे कटआऊट पाहून कुलगुरू पवार यांनी असाच पुतळा व्हायला हवा, असे सांगितले. खेडकर यांनी घोड्याचे मॉडेल करण्याकरिता खराखुरा घोडा स्टुडिओमध्ये आणला होता. 1971 ला सुरू झालेले पुतळ्याचे काम तीन वर्षांनी पूर्ण झाले. 1 डिसेंबर 1974 रोजी तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले.

लोकसहभागातून उभारला पुतळा

हा पुतळा उभारणीसाठी भोगावती, दूधगंगा-वेदगंगा, कुंभी-कासारी, वारणा व पंचगंगा या सहकारी साखर कारखान्यांनी प्रत्येकी 60 हजार रुपये दिले; तर विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी 66 हजार 590 असे मिळून 3 लाख 66 हजार रुपये आर्थिक मदत केली. लोकसहभागातूनच छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT