मुरगूड : मुरगूड शहरात रविवारी एका विवाह सोहळ्यात सर्वांनाच अचंबित प्रकार घडला. लग्नाचा मुहूर्त अवघ्या काही मिनिटांवर असताना आणि नवरदेव बोहल्यावर चढलेला असतानाच, नवरी मुलीने लग्नास स्पष्ट नकार दिला. यामुळे नियोजित वधू-वराची वरात थेट मुरगूड पोलिस ठाण्याच्या दारात पोहोचल्याने संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला.
मुरगूड येथील नवरा मुलगा आणि इचलकरंजी येथील नवरी मुलगी यांचा विवाह काही दिवसांपूर्वी सोनाळी व इचलकरंजी येथील तीन एजंटांच्या मध्यस्थीने ठरला होता. लग्नापूर्वीचे सर्व सोहळे रीतसर पार पडले होते. साखरपुडा झाला, लग्नजथ्था निघाला आणि शनिवारी सायंकाळी हळदीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. नवर्या मुलाच्या घरी गेल्या तीन दिवसांपासून लग्नाचा मंडप उभारला होता, ढोल-ताशांच्या गजरात घुगूळ काढण्यात आला. रविवारी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या मुहूर्तावर अक्षता पडणार होत्या.
पाहुणे मंडळींनी मंडप फुलला होता, भटजींनी अंतरपाट धरला होता. नवरदेव बोहल्यावर चढला; मात्र नवरीला मंडपात आणण्याची वेळ आली, तेव्हा तिने ‘मला हे लग्न करायचे नाही’, असे नवरीने ठणकावून सांगितल्याने एकच तारांबळ उडाली. यावरून दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची आणि वादावादी सुरू झाली. अखेर हा सर्व लवाजमा पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी नवरी मुलगी, तिचे आई-वडील आणि तिन्ही एजंटांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ऐन मुहूर्तावर मोडलेल्या या लग्नाची चर्चा परिसरात रंगली आहे.
हा खर्च कोणाकडून वसूल करायचा?
पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, पैशांसाठी एजंटगिरी करणार्या तिघांनी हे लग्न जबरदस्तीने लावून देण्याचा प्रयत्न केला होता. या लग्नासाठी नवर्या मुलाने मुलीच्या वडिलांना 70 ते 80 हजार रुपये दिले होते, तर एजंटांनी 50 ते 60 हजारांची दक्षिणा उकळली होती. कपडे, मोबाईल आणि भोजन समारंभ मिळून वर पक्षाचा सुमारे 2 ते 3 लाख रुपये खर्च झाला आहे. आता हा खर्च कोणाकडून वसूल करायचा? या विवंचनेत नवरदेवाकडील मंडळी आहेत.