कोल्हापूर

ब्रेकींग न्यूज: घरफाळा घोटाळा चौकशीला लागणार ब्रेक!

Arun Patil

कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापूर महापालिकेतील कोट्यवधींचा घरफाळा घोटाळा राज्यभर गाजत आहे. घोटाळ्यांच्या मालिकेमुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. कोणीही घरफाळ्याचा कार्यभार स्वीकारण्यास तयार नसताना साहाय्यक आयुक्‍त विनायक औंधकर यांच्याकडे कर निर्धारक व संग्राहक पद सोपविण्यात आले. औंधकर यांनीही 2005 पासूनचे सर्व रेकॉर्ड तपासून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.

महापालिकेचे सुमारे 9 ते 10 कोटी रुपये उत्पन्‍न वाढविण्याचा प्रयत्न केला. गैरव्यवहाराची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. तोपर्यंत कुणीतरी केलेल्या संशयास्पद तक्रारीवरून औंधकर यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. परिणामी, घरफाळा घोटाळा चौकशीला 'ब्रेक' लागणार आहे. दोषी असतील तर औंधकर यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, संशयास्पद तक्रारी करून औंधकर यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अडचणीत येणार्‍या काही अधिकार्‍यांचाच त्यात पुढाकार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

घरफाळ्यातून गैरव्यवहार करून महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा घोटाळा दोन वर्षांपूर्वी उघडकीस आला. याप्रकरणी तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, अधीक्षक नितीन नंदवाळकर, अधीक्षक कै. अनिरुद्ध शेट्ये, लिपिक विजय खातू या चौघांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतरही घरफाळा घोटाळ्याच्या तक्रारी झाल्या. परिणामी, प्रशासनाने फेरचौकशी करण्याचा निर्णय घेतला.

औंधकर यांनी सखोल चौकशी करून मूळ फिर्यादी दिलेली 3 कोटी 18 लाख ही रक्‍कम चुकीची असून, ती 1 कोटी 48 लाख असल्याचे स्पष्ट केले. तसेच, दुसर्‍या चौकशीत तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, शशिकांत पाटील, बापू माने, दिलीप कोळी यांच्यावर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याची जबाबदारी निश्‍चित केली आहे.

पहिल्या चौकशीअंती संबंधितांना निलंबित करून फौजदारी केली तशीच कारवाई करण्याची शिफारस पुराव्यासह प्रशासनाकडे केली आहे. ही कारवाई अंतिम टप्प्यात असून, पोलिसांत फिर्याद देण्यासाठी अधिकार्‍यांचीही नियुक्‍ती करण्यात आली आहे. काही दिवसांत संबंधितांविरुद्ध कारवाई होऊ शकते. त्याबरोबरच इतरही अधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत. तोपर्यंत औंधकर यांच्याविरुद्धच घरफाळा लावण्यासाठी पैसे मागितल्याची संशयास्पद तक्रार दाखल झाली आहे.

समिती त्या तक्रारीची चौकशी करून अहवाल देणार आहे. औंधकर यांनी पैसे घेतल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यास कारवाई होईल. परंतु, अशाप्रकारे संशयास्पद तक्रारीवरून वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कार्यभार काढून घेतल्यास कोणीही अधिकारी जोखमीचे काम करण्यास तयार होणार नाहीत, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे.

औंधकर यांनी घरफाळ्याचा कार्यभार घेतल्यानंतर अनेक मिळकती शोधून काढल्या. त्यातून महापालिकेच्या उत्पन्‍नात वर्षाला कायमस्वरुपी 9 कोटी रुपयांची उत्पन्‍न वाढ झाली आहे. शहरात तब्बल 1,866 मिळकतींना घरफाळा शून्य रुपये आहे. 6 हजार 574 मिळकतींची बिले इनव्हॅलीड आहेत. मोबाईल टॉवर, एटीएम अशा कमर्शियल मिळकतींना फक्‍त 10 बाय 10 मोजमापची बिले लावली आहेत. 857 मिळकतींना शास्ती लावली असली तरी गेली अनेक वर्षे ती वसूल केलेली नाही. 2 हजार 347 बिले अंतिम केली नसून, त्याचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही.

यासह विविध प्रकरणे औंधकर यांनी सखोल चौकशी करून बाहेर काढली आहेत. त्यामुळे घरफाळा भरणार्‍या मिळकतदारांची संख्या वाढून महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधींची भर पडणार आहे.

चौकशी समितीलाच अडचणीचे ठरताहेत औंधकर

घरफाळा घोटाळ्याची रक्‍कम कोट्यवधींची आहे. त्याच्या चौकशीसाठी दोन-तीन समित्या नियुक्‍त केल्या; पण काही अधिकार्‍यांना टार्गेट तर काही अधिकार्‍यांना सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रयत्न समितीकडून झाला. त्यामुळेच वेगवेगळ्या समित्या नियुक्‍त करून चौकशी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

एकाच घोटाळा प्रकरणात काही जणांना निलंबित करून थेट फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत तर काही जणांना निलंबित करून चौकशीअंती गुन्हे दाखल करण्याची शिफारस करूनही वर्षभर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. घरफाळा घोटाळा प्रकरणाला काही ठरावीक अधिकारी 'वेगळा रंग' लावण्याचा प्रयत्न करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चौकशी समितीच्या पुढे जाऊन औंधकर यांनी निष्पक्षपणे चौकशी करून गैरव्यवहार बाहेर काढले आहेत. अनेकांना नोटिसा पाठवून पोलिस कारवाईची शिफारस केली आहे. त्यातूनच काही जणांच्या चौकशी समितीला कर निर्धारक व संग्राहक विनायक औंधकर हे अडचणीचे ठरत असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. त्यामुळेच औंधकर हे कर निर्धारक व संग्राहकपदावर काही जणांना नको आहेत, असेही सांगण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT