अनुराधा कदम
कोल्हापूर : रोजच्या सवयीतील एखादे नाव अचानक विसरणे, बोलताना शब्दच न आठवणे, नेहमीच्या कामात लक्ष विचलित होणे, मनाची सतत गोंधळलेली अवस्था असणे अशा समस्यांशी सध्या रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांचा लढा सुरू आहे. रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर महिलांमध्ये या तक्रारी वाढत असून, या अवस्थेला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेन फॉग’ असे म्हटले जाते. रजोनिवृत्तीचा काळ जवळ आला की, या लक्षणांचा मारा महिलांमध्ये दिसून येत आहे.
महिलांमध्ये रजोनिवृत्तीचा पूर्व व रजोनिवृत्तीदरम्यानचा काळ भावनिकद़ृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या काळात इस्ट्रोजेनचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते. इस्ट्रोजेन मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरच्या कार्यावर प्रभाव टाकत असल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यावर परिणाम होऊ शकतो. 40 ते 55 या वयोगटातील महिलांमध्ये ही लक्षणे अधिक आढळतात. जबाबदार्यांचे ओझे, झोपेचा अभाव, ताणतणाव आणि चिंता यामुळे ही समस्या अधिक तीव— होत आहे.
‘ब्रेन फॉग’ म्हणजे काय?
फॉग म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर थंड हवेमुळे पसरलेले धुक्याचे चित्र येते; पण असे धुके आपल्या मेंदूवरही पसरू शकते. यालाच ‘ब्रेन फॉग’ म्हणतात. यामुळे विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या पूर्वलक्षणांमध्ये ‘ब्रेन फॉग’ची समस्या वाढली आहे.
‘ब्रेन फॉग’ची नेमकी कारणे काय?
हार्मोनल बदल 45 टक्के
झोपेचा अभाव 25 टक्के
मानसिक ताण 20 टक्के
समतोल आहाराची
कमतरता 10 टक्के
आकडेवारी द़ृष्टीक्षेपात
50 ते 70 टक्के महिलांची स्मरणशक्ती, एकाग्रता व विचारक्षमता कमी
2 पैकी एका महिलेत ‘ब्रेन फॉग’ची लक्षणे
40 ते 55 वयोगटात ‘ब्रेन फॉग’ समस्येचा धोका अधिक
झोपेचा अभाव असलेल्या महिलांमध्ये ‘ब्रेन फॉग’ची शक्यता दुप्पट
इन्स्ट्रोजेन हार्मोनमध्ये 60 टक्केपर्यंत घट