कोल्हापूर : जिल्ह्यातील काही खुनशी प्रवृत्ती विकासकामांमध्ये सातत्याने अडथळे आणत असल्या, तरी शहराची हद्दवाढ आणि बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग हे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच, असा ठाम विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. दहीहंडी कार्यक्रमात बोलताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह ‘गोकुळ’चे राजकीय मैदान मारण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे सांगत आगामी काळात ‘गोकुळ’मध्ये संपूर्ण सत्ता मिळवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
दहीहंडी कार्यक्रमात बोलताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली. महाडिक यांनी कोल्हापूरच्या एकजुटीचे सामर्थ्य अधोरेखित करताना महादेवी हत्तीण प्रकरण आणि सर्किट बेंचच्या स्थापनेचा दाखला दिला. ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक चांगल्या कामाला जाणीवपूर्वक विरोध केला जातो. विमानतळ होणार, असे आपण सांगत असताना माजी पालकमंत्र्यांनी महाडिकांचे विमान कुठे घिरट्या घालते बघा, असे म्हणत खिल्ली उडविली होती. परंतु, आज कोल्हापूरचे विमानतळ देशातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे.
‘गोकुळ’ दूध संघाला काही मंडळींकडून घरघर लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, महायुतीचा अध्यक्ष असूनही तेथे पूर्ण सत्ता नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोल्हापुरात भरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, आ. अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, माजी खा. संजय मंडलिक, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आ. सुरेश हाळवणकर, जयश्री जाधव, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, जयंत पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, सुजित चव्हाण, आर. के. पोवार, विश्वजित महाडिक, पृथ्वीराज महाडिक, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.