कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी राज्य शासन सकारात्मक आहे. याबाबत गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांनीच हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार प्रक्रिया सुरू असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हद्दवाढीबाबत अधिकृत बैठकच झाली नाही, असे आ. नरके यांनी सांगितले. त्यावर विचारता आबिटकर म्हणाले, हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यानुसार ती होत आहे. हद्दवाढीबाबत महापालिकेला कोणी पत्र दिले, त्यांना पत्र देण्याचा अधिकार आहे का, असे मुद्दे महत्त्वाचे नाहीत. मुख्यमंत्र्यांनीच भेटी दरम्यान हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, असे स्पष्टपणे सांगितले. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. अनेक वर्षे हद्दवाढीची रेंगाळलेली गाडी पुढे जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव सादर होत आहे, असे सांगत आबिटकर म्हणाले, या प्रस्तावानुसार पुढील कार्यवाही सुरू होईल. मात्र, हद्दवाढीला विरोध करणार्या गावांशीही संवाद साधला पाहिजे. त्यांचा हद्दवाढीबाबत असलेला गैरसमज दूर करण्याचीही जबाबदारी आमचीच आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पूरच येऊ नये, याकरिता अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहिला पाहिजे, त्यातून योग्य प्रमाणात विसर्ग झाला पाहिजे. याकरिता अलमट्टीशी प्रभावी समन्वय ठेवण्याची सूचना केली आहे. त्याबाबत दैनंदिन संपर्क, नियंत्रण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.